सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका : सुशीलकुमार शिंदे  - I was also hit by the misuse of social media: Sushilkumar Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका : सुशीलकुमार शिंदे 

भारत नागणे 
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

देशात सध्या बेबंदशाही सुरू आहे.

पंढरपूर : "देशात सध्या जे काही वातावरण तयार झाले आहे. त्यावरून देशातील सामाजिक परिस्थिती ही मृतावस्थेकडे चालली असून देशात बेबंदशाही सुरू आहे,' अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पंढरपुरात केली. 

माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी येथील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षण, हाथरसची घटना या वरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. शिंदे म्हणाले की, 
मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत आहे. सामाजिक शांतता बिघडत चाललेली आहे. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा सगळ्या घटनेमुळे देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. 

देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला स्वरूपात आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठींबा दर्शविला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असून त्याचा वापर विचार करून करावा, असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे. 

वंचित बहुज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलण्यास शिंदे यांनी या वेळी नकार दिला. या वेळी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे उपस्थित होते. 

हेही वाचा : अजित पवारांनी मानला भालकेंचा शब्द  : काळे-महाडिकांच्या कारखान्यास मदत 

पंढरपूर : विठ्ठल परिवाराशी निगडीत असलेले पण भारतीय जनता पक्षाशी सलगी केलेल्या कल्याण काळे आणि माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने मदत करावी, यासाठी आमदार भारत भालकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शिष्टाई केली होती. त्यांची ही शिष्टाई यशस्वी झाली आहे. काळे-महाडिक यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने थकहमी मंजूर करून आमदार भालके यांच्या शब्दाला किंमत दिली आहे. 

मागील वर्षीच्या गाळप हंगामात बंद असलेले विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि भीमा या तीनही सहकारी साखर कारखान्यांपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली होती. थकीत एफआरपी आणि विविध बॅंकांच्या कर्जामुळे इतर सर्व मार्ग बंद झाले होते. राज्य सरकारने हमी घेतल्याशिवाय कारखाने सुरू करणे अशक्‍य होते. 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख