बाळासाहेब ठाकरेंची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो...... - I swear Balasaheb Theackeray and mu my two daughters says Anil Parab | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब ठाकरेंची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो......

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

वाझे यांच्या आरोपनांतर दुसरा मंत्रीही अडचणीत..

मुंबई : वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी परिवहनंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली. मुबंईतील SBUT ट्रस्टकडून 50 कोटी आणि मुंबई पालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी असे शंभर कोटींची काम परबांनी मला सांगितले होते, असा आरोप वाझेंनी परब यांच्यावर केला. हे आरोप परब यांनी तातडीने फेटाळले.

या आरोपांवर स्पष्टीकरण देताना परब म्हणाले की सचिन वाझे यांनी NIA कोर्टात पत्र दिल्याचे समजले.त्यात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. वाझेवर SBUT ट्रस्टींकडून 50 कोटी घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. तसेच जानेवारी 2021 मध्ये मी वाझेला मुंबई महापालिका ठेकेदारांकडून दोन कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचेही यात म्हटले आहे. या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणिमाझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोटे आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले हे आरोप आहेत. भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ असे आधीपासून म्हणत होते. त्यामुळे भाजपने बनवलेले हे प्रकरण आहे. अनिल देशमुख यांच्या CBI चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र आले, यातील योगायोग स्पष्ट आहे.

वाझे हे पत्र देणार, हे भाजपला आधीपासून माहीत होते. म्हणून ते गाजावाजा करत आहे. आजच्या पत्रात माझ्यावर, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे उद्योजक घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत.  मी आज कुठल्याही चौकशीला सामोेरे जायाला तयार आहे.परामबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दल जे पत्र लिहिलं त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. NIA ची चौकशी स्फोटकांची आहे. पण त्याचा शोध अजून लावला नाही. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे. NIA, CBI रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे, असा दावा त्यांनी केला.

ही पण बातमी वाचा : सचिन वाझेंनी काय आरोप केले होते?

सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्र बाहेर काढून सरकार ला बदनाम करतात. वाझे काही काळ शिवसेनेत होते, प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असे काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला जात आहे. बदनामीचा हा `लेटर बॉम्ब` काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा. मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने लढणार. मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना मी घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. माझा गृहखात्याशी काय संबंध?.मी वकील आहे. मला गृहखात्याची माहिती आहे. एक मंत्री म्हणून मुख्यमंत्र्याना मदत करणं माझं काम आहे. पोलिस दलाशी माझा चांगला संबंध आहे. पोलिसांशी बोलणं माझं काम आहे. त्यामुळे त्यावरून माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे.

मी राजीनामा का देऊ, असा सवाल करत माझा राजीनामा माझे पक्षप्रमुख मागतील. भाजपच्या सांगण्यावरून मी राजीनामा का देऊ, असेही त्यांनी विचारले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख