सुशांतसिंह प्रकरणात नारायण राणे यांची उडी : खळबळजनक आरोपांचा धडाका - I have the names of those present at that party says Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणात नारायण राणे यांची उडी : खळबळजनक आरोपांचा धडाका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राज्यातील एका मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा राणे यांचा आरोप

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्यावर टीका करणारे युवा सेनेचे वरुण सरदेसाई कोण आहेत? ते राजकारणात कधी आले ते मला माहीत नाही. ते अजून लहान आहेत. ठाकरेंचे हे नातेवाईक चमचेगिरी करतात. ते लहान आहेत. त्यांनी आपले तोंड बंद ठेवाले नाहीतर त्यांच्या कुंडल्या काढाव्या लागतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.

सुशांतसिह याच्या आत्महत्येबाबत राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तसेच ही आत्महत्या नसून तो खून असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच सुशांतसिंह याच्या पार्टीला कोण हजर होते, हे त्यांनी जाहीर करावे नाही तर मी जाहीर करेन असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नसल्याचे विधान अमृता फडणवीस यांनी केले होते. त्याला सरदेसाई यांनी प्रत्युत्तर देत तसे असेल महाराष्ट्र पोलिसांचे संरक्षण परत करा, अशी मागणी केली होती. त्यावरून राणे यांनी सरदेसाई यांच्यावर टीका केली.

सुशांतसिंहच्या प्रकरणात कोणा तरी मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सुशांतसिंह यांचा विषय जास्तच गाजत आहे. सुशांतची आत्महत्या नाही असे मी देखील म्हणतो. त्याची आत्महत्या झाली नाही तर त्याचा मर्डर झाला आहे. कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. त्याचा मृत्यू होऊन पन्नास दिवस झाले. तरी याबाबतच्या तपासात अद्याप स्पष्टता नाही. आठ जूनच्या पार्टीला कोण होते? त्या पार्टी सहभागी झालेल्यांना का अटक करत नाहीत, असे सवाल त्यांनी केले.

ठराविक हॉस्पिटलमध्येच सुशांतला का नेण्यात आले? दिनू मोरीया कोण आहे? त्याच्या घरात रोज मंत्री येतात. सुशांतच्या घराजवळ तो बंगला आहे. या बंगल्यात आल्यानंतर ते सुशांतच्या घरी जातात, अशीही माहिती राणे यांनी या वेळी दिली. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह हे कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्य कारकिर्दीवर काळिमा पडू देऊ नये, असेही राणे यांनी या वेळी सांगितले. वेळ आल्यावर न्यायालयातही पुरावे सादर करू, असे आव्हान राणेंनी दिले. 

मंत्रालय बंद करा

राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली. सरकार म्हणून अस्तित्वात आहे असे वाटतच नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत दरवर्षी पाऊस पडतो. आज पाऊस पडला तर मंत्रालयाला सुट्टी दिली. त्यामुळे मंत्रालयात कोणी उपस्थित नाही. असेही त्यात कोणी बसत नसेल तर मंत्रालय बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख