मी नितेश राणेंना फोन केला होता पण काॅन्टक्ट झाला नाही... अन्यथा..!

आमदार गायकवाडांच्या आरोपाने भाजपच्या गोटात खळबळ
MLA Sanjya Gaykwad-nitesh rane
MLA Sanjya Gaykwad-nitesh rane

बुलाढाणा :  शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई सुरू झाली आहे. राज्यातील इतर भाजप नेत्यांनी गायकवाड यांच्या टिकेचा समाचार घेतला. त्यानंतर आज पुन्हा गायकवाड यांनी आपल्या आरोपावर ठाम राहत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली. 

भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला पाहवत नाही. त्यामुळे राज्यातील सरकार अडचणीत आणण्याचा त्यांचा उद्योग थांबलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे नेते खालच्या पातळीवर टीका करतात मग आम्ही या भाजपवाल्यांची पूजा करायची का, असा सवाल गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. कोरोनावर भाजप राजकारण करीत आहे. या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. लोक आज रेमडिसिवीर, ऑक्सिजन व बेड न मिळाल्याने मरत आहेत.  भाजपा यावर राजकारण करीत आहे. कुठलीही औषधे राज्याला मिळू देत नाहीत. पंतप्रधान हा देशाचा राजा आहे. त्यांना सर्व जनता सारखी असायला पाहिजे. पण महाराष्ट्राला दुजाभाव दिला जात आहे. मी आज शिवसेनाच्या वतीने पोलिस अधीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार देणार आहे. तिथे  न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. मी भाजपच्या मंडळींवर आरोप केल्याने आता माझ्याविरोधात पुतळे जाळण्याचा कार्यक्रम झाला. आता सीबीआय, ईडी या संस्थांच्या कारवाया सुरू होतील. पण मी एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. अशा कारवायांना मी भीत नाही. 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली होती व मातोश्रीवर कोरोनाचे विषाणू नेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राणे यांच्याबद्दल पण गायकवाड हे चिडून बोलले. मी त्यांना फोन केला होता. मात्र तो लागला नाही. नाहीतर तेथेच `चर्चा` केली असती. आता मात्र त्यांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत रात्रीची उतरली नसल्यामुळे त्यांनी अशी टीका केली असल्याचा खोचकपणे सांगितले होते. त्यावरही गायकवाड यांनी आपण सायंकाळी पाच वाजताच ही पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे फडणवीस म्हणतात तसे मी काही बरळलेलो नाही. मला ते म्हणतात तशा सवयी पण नाहीत. पण याच बुलढाणा जिल्ह्याच्या आणि भाजपच्या माजी मंत्री कुठेकुठे जात होते, हे त्यांना माहिती असेलच. डान्स बारमध्ये कोण जात होते, याच्या क्लिप माझ्याकडे आहेत. पण मला त्याच्यावर काही बोलायचे नाही, असेही गायकवाड म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com