छुप्या चर्चा करण्याची मला गरज नाही.. : शौमिका महाडिक - I do not need to have a secret discussion says Shoumila Mahadik | Politics Marathi News - Sarkarnama

छुप्या चर्चा करण्याची मला गरज नाही.. : शौमिका महाडिक

सुनील पाटील
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता!

कोल्हापूर : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आपला विचार नाही. यापुढेही नसणार आहे. छुप्या चर्चा करण्याची आपल्याला गरज नाही. ज्यावेळी, पदवीधरसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असेल त्यावेळी, आपली भूमिका उघडपणे जाहीर केले जाईल. भाजप हा पक्ष लोकशाही मूल्यांवर चालणार पक्ष आहे. त्यामुळे, पक्षश्रेष्ठींनाही माझी भूमिका सांगेन, पण सध्या पुणे पदवीधरमधून निवडणूक लढविणार नसल्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेमध्ये सौ. महाडिक यांनी केलेल्या कामाचे सोशल मिडियावरून कौतुक होत आहे. धाडसी निर्णय घेवून जिल्हा परिषदेचा कारभार कसा करावा, हे ही दाखवून दिले. त्यामुळे सोशल मिडियाच्यामाध्यमातून सौ. महाडिक यांना पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. या पार्श्‍वभूमीवर `सरकारनामा`ने त्यांच्याशी संवाद साधला.

सौ. महाडिक म्हणाल्या, पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. पदवीधरांच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे, हे सर्वांनाच अपेक्षित आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे असे दिग्गज आणि अनेक उमेदवार यासाठी सध्या इच्छुक आहे. मला उमेदवारी मिळावी असे वाटणाऱ्यांचा मी आदर करते. पण सध्याच्या निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही आणि नसणार आहे. पक्ष जो उमेदवार देणार आहे, त्या उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी आम्ही सर्व ते परिश्रम घेण्यास सज्ज आहोत. त्यामुळे या मतदार घातून मला उमेदवारी हवी असेल तर मी जाहीरपणे सांगू शकते. पण सध्या तो विचार नसल्याचेही सौ महाडिक यांनी सांगितले.

भाजपकडून या विधान परिषद मतदारसंघात अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, राजेश पांडे, शेखर चरेगावकर, शेखर मुंदडा आदी इच्छुक आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख