मला कोरोना झाला नाही ही तर देवाची कृपा : अनिल देशमुख  - I didn't get corona, it's God's grace: Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

मला कोरोना झाला नाही ही तर देवाची कृपा : अनिल देशमुख 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख कारोनाच्या संकटातही कधी गप्प बसले नाहीत.

पुणे : " गेल्या साडेचार महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे. या संकटाच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मी स्वस्थ बसलो नाही. माझ्या मतदारसंघासह तीस जिल्ह्याचा दौरा मी केला. पण, मला कोरोना झाला नाही ही तर देवाजी कृपा आहे ! असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने विरोधक आरोप करीत आहेत की मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पडायला हवे. मात्र जर कार्यालयात बसून प्रश्‍न सुटत असतील तर बाहेर पडण्याची गरज काय असा सवाल शिवसेनेतर्फे विरोधकांना केला जात आहे. असे आरोपप्रत्यारोप गेल्या चार महिन्यापासून होत आहेत. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख कारोनाच्या संकटातही कधी गप्प बसले नाहीत किंवा घर, कार्यालयातून त्यांनी कारभार केला नाही. 

हे दोन मंत्री असे आहेत की ते नेहमीच रस्त्यावर उतरले आणि जनतेची सेवा करीत राहिले. मग ते लॉकडाऊन असो किंवा परप्रांतियांना आपल्या गावी जाणे असो. टोपे यांच्याप्रमाणे देशमुख हे ही सतत दौरे करताना दिसत होते. याकडे लक्ष वेधत त्यांना विचारण्यात आले की आपण इतके दौरे करूनही आपणास कोरोना कसा झाला नाही. या वयातही फिट कसे काय ? 

यावर मंत्री देशमुख म्हणाले, "" देवाची कृपा आहे. त्यामुळेच मला कोरोना झाला नाही. मी आजपर्यंत तीस जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. पहिल्या दिवसापासून मी सतत दौरे करीत आहेत. लोकांच्या अडीअडचणी सोडवित आहेत. गेली 21 वर्षे मंत्री आहे. सरळ मार्गी असावे असा माझा स्वभाव आहे. अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केल्याचा पाठिशी अनुभव आहे, त्यामुळे शरद पवारसाहेबांनी माझ्यावर गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपविली असावी असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकार येणार नाही अशी भविष्यवाणी आपण केली होती ? ती खरी ठरली याविषयी विचारले असता ते म्हणाले, की राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर होते. मात्र भाजप ज्या पद्धतीने शिवसेनेला वागणूक देत होता, त्याचे परिणाम निवडणुकीनंतर होतील असे मला वाटत होते. म्हणून मी काटोलच्या एका सभेत राज्यात आघाडीचे सरकार येणार असल्याचे बोललो होतो. पुढे निकालानंतर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख