ओबीसी म्हणून महसूल खातेही नाही आणि लढा पुकारला म्हणून धमक्या... - I did not get revenue portfolio because I am OBC says Wadettivwar | Politics Marathi News - Sarkarnama

ओबीसी म्हणून महसूल खातेही नाही आणि लढा पुकारला म्हणून धमक्या...

अतुल मेहेरे
रविवार, 27 जून 2021

ओबीसी नेत्यांची एकजूट करण्याचा वडेट्टीवारांचा प्रयत्न... 

लोणावळा (जि. पुणे) :  सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द (Supreme court cancels OBC reservation) ठरविल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज जागा झाला.  आरक्षण टिकविण्याचा लढा देत असताना येथे आयोजित चिंतन शिबिराची भूमिका स्पष्ट करत असताना जेव्हापासून ओबीसींचा लढा सुरू केला आहे, त्यानंतर मला धमक्या येत आहे, असा आरोप ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे केला. पण धमक्या कोण देत आहे, हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे वडेट्टीवारांना धमक्या देतंय कोण, हा प्रश्न आज चर्चेत राहिला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी लोणावळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची लोणावळ्यात परिषद झाली. त्यात वडेट्टीवार यांनी हा आरोप केला.

वडेट्टीवार म्हणाले, आता आपल्याला पुढे काम करायचे आहे. मागे काय झाले ते सोडून द्यावे लागेल. ही काही सोपी लढाई नाही. ही प्रस्थापितांच्या विरोधातील लढाई आहे. मला भिती नाही, कारण माझा नेताच ओबीसी आहे. काळजी आहे ती बावनकुळे साहेबांची. समाजासाठी काम करताना पक्ष नाही, मंत्रिपदही महत्वाचे नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी मी केव्हाही वाकायला आणि झुकायला तयार आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावर आलो, तर कुणाला वाटत आहे, की आम्ही विरोधात आहो. पण वास्तविकतः तसे नाही. आज केवळ राजकीय आरक्षणाचा विषय आहे आणि आज जर लढलो नाही, भविष्यात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणही जाण्याची भिती आहे.

वाचा ही बातमी : भुजबळांना या वयात खोटं बोलावं लागतं याच वाईट वाटतं...

आरक्षण टिकविण्याची लढाई लढत असताना विविध राजकीय पक्षांतील ओबीसींचे नेते आतापर्यंत एकमेकांना दोष देत होते. "हाही दोषी, तोही दोषी. अन् दोन्ही घरचा पाव्हणा उपाशी", असे सध्या होत आहे. मुळात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडेसुद्धा हेच काम करत आहेत आणि आम्हीसुद्धा हेच काम करत आहोत. उद्यापासून चार गाड्या काढून निघा. अन् राज्यभर फिरा चार दिवसांत २५ लाखाची सभा होईल, येवढी आपली ताकत आहे. फक्त ती आपण ओळखली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

हक्कांसाठी लढणे, ही आपल्यासाठी आजची गरज आहे. "झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहीये.", असे म्हणत त्यांनी ओबीसी बांधवांमध्ये जोश निर्माण केला. ओबीसी मंत्रालय तुमच्याच राज्यात झाले, ते बरे झाले कारण ते मंत्रालय तयार झाले म्हणून मला मिळाले. पण जेव्हा मिळाले तेव्हा तेथे चपराशीही नव्हता, तोही भाड्याने घ्यावा लागला, असे चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना उद्देशून वडेट्टीवार म्हणाले.

मी ओबीसी मंत्रालयासाठी पैसा मागितला, तर आपलंच सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती झाली आहे. मी विरोधी पक्ष नेता होतो, त्यामुळे मला वाटलं होतं की, महसूल सारखे महत्वाचे खाते मिळेल, पण मिळाले ओबीसी मंत्रालय. पंकजाताई तुम्हाला मिळाले ग्रामविकास, तुम्हाला तर त्यापेक्षाही मोठे खाते मिळायला पाहिजे होते. पण तसे घडले नाही. कारण ओबीसींची ताकत आपण आजवर दाखवलीच नाही. पण आता आपली ताकत दाखवण्याची वेळ आली आहे. ओबीसी खाते सांभाळताना माझ्या समाजावर अन्याय होतो आहे, म्हणून मी लढायला समोर आलो आहे आणि ही लढाई लढताना प्रसंगी मंत्रिपदही पणाला लावेन, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख