भाजपमधील उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल... शिवसेनेची टीका  - The hypocrisy of foreign pro-Hindu activists in BJP will be exposed by the people  Shiv Sena's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमधील उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल... शिवसेनेची टीका 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

मुंबई : भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपतील ‘उपऱयां’नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? 

देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल. त्यांच्या मानेवर रिकामी मडकी आहेत, पण मडकी बनविणाऱ्या पांडुरंगभक्त गोरा कुंभाराच्या वंशजांनाही आम्ही श्रद्धेने नमस्कार करीत आहोत. पांडुरंगाचरणी महाराष्ट्र नेहमीच लीन झाला आहे. पांडुरंग महाराष्ट्राच्या मनात आहे, असे 'सामना'त म्हटले आहे. 

 भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल. बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल, अशी टीकास्त्र शिवसेनेने भाजपवर सोडले आहे. 

  1. मंदिरे, बाजार, सार्वजनिक स्थळे यातूनच कोरोनाचे संक्रमण वाढणार असे तज्ञांना वाटते. पण वैद्यकीय सल्ले, तज्ञांचे मार्गदर्शन याची पर्वा करतील ते भाजपवाले कसले? 
  2. दिल्लीत सर्वकाही घिसाडघाईत उघडले. त्याचा परिणाम तेथे कोरोनाची दुसरी लाट येण्यात झाला. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दुसऱया लॉक डाऊनचा निर्णय घेतला तर त्यात मंदिरे पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. 
  3. उपऱया हिंदुत्ववाद्यांचा या प्रश्नी अभ्यास कच्चा आहेच. शिवाय त्यांना आपल्या प्रजेची काळजी नाही. इंग्लंड, युरोपीय देशांमध्ये पुन्हा लॉक डाऊन का सुरू झाले, ते मंदिर उघडण्याचे नाचरे श्रेय घेणाऱयांनी समजून घेतले पाहिजे.  
  4. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ते अशा प्रकारची आंदोलने करून लोकांना संकटात ढकलत आहेत. हे क्रौर्यच म्हणायला हवे. हरयाणात घाईघाईने शाळा सुरू केल्या. तेथे पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. 
  5. भाजपतील उपऱया व नाच्या हिंदुत्ववाद्यांना मंदिरे उघडा असे आंदोलन करायचे होते तर त्यांनी ते पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवे होते.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख