ऑक्सीमीटर नाही? मग अशी मोजा ऑक्सीजन पातळी अन् लक्षणांवरही ठेवा लक्ष - How to measure oxygen level without pulse oximeter | Politics Marathi News - Sarkarnama

ऑक्सीमीटर नाही? मग अशी मोजा ऑक्सीजन पातळी अन् लक्षणांवरही ठेवा लक्ष

वृत्तसंस्था
रविवार, 30 मे 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणुची लागण झालेल्या अनेक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सीजनची पातळी कमी होते. फुफ्फूसामध्ये संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होता. तर काही रुग्णांना ऑक्सीजन पातळी कमी होऊनही त्रास जाणवत नाही. आता बहुतेकांच्या घरात पल्स ऑक्सीमीटर असून त्याद्वारे ऑक्सीजन पातळी (Oxygen level) मोजली जाते. पण ऑक्सीमीटर नसले तरी आपण सोप्या पध्दतीने ही पातळी मोजू शकतो. तसेच काही महत्वाच्या लक्षणांबाबत सजग राहिल्यास आपल्याला ही बाब ध्यानात येऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (How to measure oxygen level without pulse oximeter)

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे. याविषयी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रविचंद्र यांनी सांगितले की, रुग्णांपैकी केवळ 15% कोविड रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असतात. 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य किंवा कमी लक्षणे आढळून येतात. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी 94 टक्केच्या खाली उतरण्याची शक्यता असते. तीव्र लक्षणे असलेल्या 5 टक्के रुग्णांच्या बाबतीत श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला 30 पेक्षा जास्त असू शकतो आणि रक्तातील प्राणवायूची पातळी 90% पेक्षाही कमी असू शकते.

हेही वाचा : म्युकरमायकोसिस टाळायचायं? या पाच गोष्टींची घ्या काळजी

ऑक्सीजन पातळी कमी झाल्याची प्रमुख लक्षणं :

सर्वसाधारण - श्वासोच्छवासास त्रास, संभ्रमावस्था, झोपेतून जागे होण्यात अडचण येणे आणि ओठ किंवा चेहरा निळा पडणे.
प्रौढांमध्ये - छातीत दुखण्यास सुरुवात होते व ते दुखणे थांबत नाही. 
बालकांमध्ये - श्वसनास त्रास होऊन त्यांच्या नाकपुड्या फेंदारल्यासारख्या होतात, श्वास घेताना ही बालके कण्हतात किंवा त्यांना खाणेपिणे अशक्य होते.

ऑक्सीजन पातळी मोजण्याचा सोपा मार्ग :

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आता जवळपास प्रत्येक घरात ऑक्सीजन पातळी मोजण्यासाठी पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. अगदी काही सेंकदामध्ये त्याद्वारे ऑक्सीजन पातळी मोजता येऊ शकते. ऑक्सीजनची पातळी 93 पेक्षा कमी असेल तर लगेच रुग्णालयांत उपचाराची गरज असते. पण ऑक्सीमीटर नसल्यासही आपल्याला ऑक्सीजन पातळी मोजता येऊ शकते ती आपल्या श्वसनाच्या वेगाच्याआधारे.

बंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक डॉ. सोमशेखर यांनी दिलेल्या माहतीनुसार, तुमचा हाताचा तळवा छातीवर ठेवा एका मिनिटासाठी तुमचा श्वसनाचा दर मोजा. जर तो 24 प्रति मिनिट यापेक्षा कमी असेल तर तुमची प्राणवायूची पातळी सुरक्षित आहे. मात्र जर एखादा रुग्ण दर मिनिटाला 30 पेक्षा अधिक श्वास घेत असेल तर त्याची प्राणवायूची पातळी खालावली आहे, असे समजावे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख