गृहमंत्री जास्त बोलतात, म्हणून किंमत मोजत आहेत! राऊतांनी देशमुखांना पाडलं तोंडावर - Home ministers talk more says Shivsena MP sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

गृहमंत्री जास्त बोलतात, म्हणून किंमत मोजत आहेत! राऊतांनी देशमुखांना पाडलं तोंडावर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मागील काही दिवसांपासून संजय राऊत एकटेच सरकारची पाठराखण करताना दिसत आहेत.

नवी दिल्ली :  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने या प्रकरणीची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर सातत्याने सरकार व देशमुखांची पाठराखण करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज देशमुखांना सणसणीत टोला लगावला आहे. तसेच सरकारलाही घरचा आहेर दिला आहे.

परमबीर सिंग यांचे पत्र, रश्मी शुक्ला यांचा अहवाल, सचिन वाझे या प्रकरणांवर मागील काही दिवसांपासून संजय राऊत सरकारची पाठराखण करताना दिसत आहेत. विरोधी पक्षांच्या टीकेला व आरोपांना तेच सामोरे जात आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांना ते परतवून लावत आहेत. आज मात्र त्यांनी गृहमंत्र्यांसह सरकारलाही घरचा आहेर दिला. 

हेही वाचा : महाआघाडीत बिघाडी? संजय राऊतांविरोधात नाना पटोलेंची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कमी बोलायचं असतं. मात्र आपले गृहमंत्री जास्त बोलत आहेत. त्याची किंमत ते मोजत आहेत. सचिन वाझे ला एवढे अमर्याद आधिकार कोणी दिले? गृहमंत्र्यांना हे माहीत नव्हतं का ? सचिन वाझे हवं तस काम करतोय. हे गृहखात्याच्या इंटलिजन्स का समजले नाही, असे प्रश्न उपस्थित करून राऊत यांनी थेट गृहमंत्र्यांवर टीका केली. 

 ...म्हणून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

विरोधी पक्षनेत्यांची उंची नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त असावी. सह्याद्री पेक्षाही ते मोठे आहेत. म्हणूनच ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही व्यवस्थित सांभाळत नाहीत, असा टोला राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विरोधी पक्षनेत्यांना त्या पदाची प्रतिष्ठा कमी होईल, असं वर्तन करू नये. राज्यातील किंवा देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोध पक्षनेता असतो, याचे भान ठेवावे, अशी टीका राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

राज्यपालांवरही टीका

राज्यपाल खूप व्यस्त आहेत. आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे की नाही हेही माहिती नाही. दोन दिवसांपासून राजभवनमध्ये तर भाजपच्या नेत्यांची ये-जा, खाणे-पिणे सुरू आहे. मंत्रीमंडळाने १२ जणांची यादी पाठवून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ते अभ्यास करतात, हे ठीक आहे. पण त्यातून त्यांना पीएचडी मिळवायची आहे का? ही नावे जास्तीत जास्त काळ आपल्या मांडीखाली लपवून ठेवण्याचा विक्रम करायचा आहे का?, अशी टीका राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख