महाराष्ट्रात गृहमंत्र्याला मुदतीच्या आधी राजीनामा द्यावाच लागतो....

गृहमंत्रीपद हे महत्वाचे असले तरी त्यात काटेरी वळणेही फार असतात....
R. R Patil, Bhujabal, Deshmukh
R. R Patil, Bhujabal, Deshmukh

पुणे : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी हफ्तेवसुलीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत आले होते. अखेर या आरोपांची सीबीआय चौकशीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. नवा गृहमंत्री कोण असणार, याची चर्चा रंगू लागली आहे.

गृहमंत्रीपद हे पद राज्यातील अतिशय महत्वाचे खाते असते. त्यामुळेच आघाडी किंवा युती सरकारच्या काळात या पदासाठी रस्सीखेच होत असते. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांकडेच हे खाते असल्याचा प्रघात 1995 पर्यंत होता. मुख्यमंत्र्याला सहकार्यासाठी राज्यमंत्री नेमलेले असतात. पण खरा ताबा हा मुख्यमंत्र्याकडेच असतो. 1995 पर्यंत वसंतराव नाईक वगळता इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांने सलग पाच वर्षे कारभार केला नाही. मुदतीच्या आधीच मुख्यमंत्री बदलले गेले. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, अ. र. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, सुधाकरराव नाईक असे मुख्यमंत्री राज्यात झाले. पण कोणीही पदाची पाच वर्षे पूर्ण केली नाही. या सर्वांकडे गृहखाते होते. त्यामुळेच हे खाते सांभाळणाऱ्याला सलग पाच वर्षे काम करता येत नाही, असाच त्याचा अर्थ होतो.  अर्थात यास दोनच अपवाद आहेत.

राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांच्याकडे हे पद गेले. त्यांनी हे पद स्वतंत्रपणे सांभाळले आणि आपला ठसाही उमटवला. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर त्या काळात काही बालंट आले नाही. युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीच राजीनाम दिल्यानंतर मुंडे यांनाही परत नारायण राणेंच्या मंत्रीमंडळात पुन्हा शपथ घ्यावी लागली.

त्यानंतर 1999 मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये हे पद राष्ट्रवादीकडे आले. उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्याकडे गृहखाते त्या वेळी आली. त्यांनी 2003 पर्य़ंत या खात्याची सूत्रे सांभाळली. मात्र एका वाहिनीवरील हल्ला झाला आणि त्यात भुजबळ यांचा राजीनामा झाला. त्याच वेळी तेलगी प्रकरणाचेही बालंट भुजबळ यांच्यावर आले. त्याच्यातून ते कसबसे वाचले पण काही दिवसांनी त्यांचा राजीनामा घेण्यात आला.

त्यांच्यानंतर स्वच्छ प्रतिमेचेे म्हणून आर. आर. पाटील यांच्याकडे गृहखाते आले. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ हे खाते सांभाळल्याचा विक्रम आर. आर. यांच्या नावावर जमा आहे. ते 2003 ते 2004, 2004 ते 2008 आणि 2009 ते 2014 अशी तब्बल दहा वर्षे या पदावर होते. मात्र 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याला जबाबदार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला. म्हणजे या वेळी मुदतीच्या आधीच त्यांचा राजीनामा झाला. त्यांच्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे या पदाची सूत्रे आली. पण त्यांना एक वर्षासाठीच या पदावर काम करण्याची संधी मिळाली. 2009 मध्ये आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर जयंतरावांना ग्रामविकास खाते देण्यात आले आणि आर. आर. पाटील हे पूर्णवेळ मंत्री बनले. या वेळी त्यांनी आपली गृहमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण केली. पण मुदतीआधीचा एक राजीनामा त्यांच्या नावावर आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा गृहखाते येण्याची वेळ ही 2014 मध्येच आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गृहखाते सांभाळत पाच वर्षे कारभार केला. त्यामुळे या मुदतीआधीच्या राजीनाम्याला वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस हेच आतापर्यंत अपवाद ठरले आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे अनपेक्षितरित्या गृहमंत्री बनले. मात्र दीड वर्षांच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com