अमित शहा म्हणतात, मी पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण...!  - HM Amit Shah Criticise CM Mamta Banerjee on resignation demand | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा म्हणतात, मी पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण...! 

वृत्तसंस्था
रविवार, 11 एप्रिल 2021

अमित शहा यांच्याकडून पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान झाले असून चार टप्पे बाकी आहे. नुकताच कूचबिहार जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ममतांनी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अमित शहा यांच्याकडून पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार सभांसह रोड शो, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. ममतांनी केलेल्या मागणीवरून त्यांनी आज पलटवार केला आहे. शहा म्हणाले, ''दीदी माझा राजीनामा मागत आहेत. मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण बंगालचे लोक म्हणाले तर. मी माझी मान खाली घालून त्यासाठी तयार आहे. पण ममतांना 2 मेला मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. कारण या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार आहे.''

ममतांवर टीका करताना शहा म्हणाले, बेकायदेशीरपणे बंगालमध्ये येणाऱ्यांसाठी नागरिकता कायद्याला त्या विरोध करत आहेत. बेकायदेशीरपणे बंगालमध्ये येणारे नागरिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेतात आणि दंगे करतात. मतुआ समुदायातील नागिरकांना नागरिकता मिळाली तर दीदींना काय अडचण आहे? बेकायदेशीरपणे आलेले लोक नाराज होतील, याची त्यांना चिंता आहे. अशा लोकांना आता राज्यावर शासन करण्याचा अधिकार नाही, असे शहा यांनी सांगितले. बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर बेकायदेशीर येणाऱ्यांना पूर्णपणे रोखले जाईल. सरकार आल्यानंतर सीएएविरूध्द विधानसभेत मंजुर करण्यात आलेला प्रस्ताव रद्द केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कूचबिहारमधील घटनेनंतर ममतांनी तिथे जाण्याची घोषणा केली होती. पण निवडणूक आयोगाना त्यांना तिथे जाण्यापासून रोखले आहे. त्यावर टीका करताना ममतांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. ''निवडणूक आयोगाचे नाव बदलून एमसीसी म्हणजे मोदी कोड अॅाफ कंटक्ट करायला हवे. भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण मला आपल्या लोकांसोबत उभे राहण्यापासून आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही,'' असे ट्विट ममतांनी केले आहे. 

निवडणूक आयोगाने कूचबिहारमध्ये जाण्यापासून तीन दिवस नेत्यांना मनाई केली आहे. रविवारी तृणमूलने ममता बॅनर्जी  तिथे जाणार असल्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोग आपल्याला केवळ तीन दिवस थांबवू शकतो. पण चौथ्या दिवशी मी माझ्या लोकांपर्यंत पोहचणार, असेही ममतांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख