हिंदू धर्म अस्वस्थ आहे...त्याचे सीमोल्लंघन होऊ द्या ! - Hinduism is unsettled. Let it be a transgression on the occasion of Dussehra  | Politics Marathi News - Sarkarnama

हिंदू धर्म अस्वस्थ आहे...त्याचे सीमोल्लंघन होऊ द्या !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

देश लुटण्याचे सीमोल्लंघन सदासर्वकाळ सुरूच असते तेथे आपट्याच्या पानास कोण विचारणार!

मुंबई  :  "यंदाचा दसरा नेहमीपेक्षा खरेच वेगळा आहे. सर्व काही शांत आहे, पण हिंदू धर्म अस्वस्थ आहे. दसऱ्याच्या निमित्ताने त्याचे सीमोल्लंघन होऊ द्या!, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केले. 'सामना'च्या 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी आपले विचार मांडले आहेत. 

दसऱ्याचे स्वरूप आता बदलत आहे. सीमोल्लंघनाचे प्रकारही बदलताना दिसत आहेत. दसऱ्याचा उत्सव हा राजेरजवाड्यांचा. त्यांच्या वैभवशाली स्वाऱ्या या दिवशी निघत. दसरा उत्सव मैदानात आणून सीमोल्लंघन करण्याचे श्रेय जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि शिवसेनेला. शिवतीर्थावर पन्नास वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे सोने जनतेवर उधळत ठेवले. आज कोरोनामुळे सर्व शांत आहे, असे रोखठोकमध्ये म्हटलं आहे. 

 
रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात, "आजचा दसरा नेहमीपेक्षा वेगळा आहे. कोरोनामुळे गणपती, नवरात्रीसारखे उत्सव थंडपणे पार पडले. देव, देवता आले आणि गेले ते कुणालाच कळले नाही. दसऱ्याच्या वैभवशाली शोभायात्रा निघणार नाहीत. सीमोल्लंघनाचे सोने लुटण्यासाठी एकमेकांच्या घरी जाणे, आलिंगने देणे होणार नाही. ज्यांना येथे फक्त धर्माचेच राज्य आणायचे होते व ज्यांनी त्यासाठी धर्मयुद्धाचे शंखनाद केले त्यांनाही आता पटले असेल, एका विषाणूने धर्माचा पराभव केला. विषाणू रोखण्यासाठी देवांनाही बंदी केले व भक्तांचा प्रवाहच गोठवला. त्यात सगळ्यांचेच सणवार संकटात आले."" 

दसऱ्याचा उत्सव म्हणजे प्रसन्नता. सीमोल्लंघन आता पूर्वीसारखे राहिले नाही. कारण आपट्याची पाने लुटण्यात नव्या पिढीस रस उरला नाही. देश लुटण्याचे सीमोल्लंघन सदासर्वकाळ सुरूच असते तेथे आपट्याच्या पानास कोण विचारणार! दसऱ्याच्या उत्सवात आजही पालख्या निघतात, सोने लुटतात, पण शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात विचारांचे सोने जनतेवर उधळणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोठे आहेत? सोने लुटताना तोफगोळे सोडणारे, विरोधकांच्या गंडस्थळावर हल्ला करून दाणादाण उडवणारे बाळासाहेब ठाकरे हे ज्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पाहिले आहेत, त्यांनाच सीमोल्लंघन कशाला म्हणतात ते कळेल, असं सांगून बाळासाहेबांच्या आठवणींना यात उजाळा देण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील 250 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतर करणाऱ्यांत 65 वर्षांचा इंदर राम आहे. दिल्लीतील शहादरा येथे तो राहतो. हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील हिंदू दलितांना सामाजिक बहिष्कारास सामोरे जावे लागले. बौद्ध धर्मात जातपात नाही. तेथे कोणी ठाकूर नाही, वाल्मीकी नाही. प्रत्येक जण मनुष्य आहे आणि सगळे जण बौद्ध आहेत.

धर्मांतराशिवाय दुसरा मार्ग नव्हता असे इंदर राम सांगतात. अयोध्येत हिंदुत्वाचे राममंदिर उभे राहत आहे, पण इंदर ‘राम’ने हिंदू धर्मच सोडला. दसऱ्याला हिंदुत्वाच्या पालख्या मिरवल्या जातील, विचारांचे सीमोल्लंघन होईल, पण जाती प्रथेस कंटाळून हिंदू समाज धर्मांतर करीत आहे. पाकिस्तानातील हिंदूंची चिंता वाहणे हे राजकारण सोपे आहे. आपल्या डोळ्यांसमोर इंदर राम हिंदू धर्माचा त्याग करतोय. हा दसरा नेहमीपेक्षा खरेच वेगळा आहे, असे रोखठोकमध्ये नमूद केले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख