काँग्रेसने डावललं अन् भाजपने हेरलं; आज मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात... - Himanta Biswa Sarma is Assams new Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसने डावललं अन् भाजपने हेरलं; आज मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात...

वृत्तसंस्था
रविवार, 9 मे 2021

काँग्रेसला केवळ आसामच नव्हे तर ईशान्येकडील काही राज्यांमध्येही फटका बसला.

गुवाहाटी : एकेकाळी काँग्रेसचा (Congress) गड असलेल्या आसाममध्ये आता सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. सर्वानंद सोनोवाल (Sarwanand Sonowal) यांना मागे टाकत हेमंत बिस्वा सरमा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. आज नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाच वर्षांतच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. (Himanta Biswa Sarma is Assams new Chief Minister)

आसाममध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. भाजपने १२६ जागांपैकी ६० तर सहयोगी पक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने नऊ आणि पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवत बहूमत संपादन केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता. पण अखेर भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले. भाजपच्या या विजयात अर्थाच सरमा यांचा वाटा महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे पक्षाने मुख्यंमत्रीपदासाठी त्यांच्या नावाला पसंती दिली. 

हेही वाचा : फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? 'मनोरा' गैरव्यवहाराचा आरोप खोटा

सरमा यांच्या राजकारणाची सुरूवात अॅाल आसाम स्टुडंट्स युनियन (AASU) मधून झाली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी १९९६ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढवली. पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना राजकारणातून दूर सारण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांच्यातील राजकारणी स्वस्थ बसला नाही. मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी त्यांना २००२ मध्ये मंत्री केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २००२ ते २०२१ या काळात त्यांनी अर्थ, आरोग्य, कृषी, शिक्षण अशी अनेक खाती समर्थपणे सांभाळली.

काँग्रेसने डावललं

आसाममध्ये काँग्रेस पक्ष सलग १५ वर्ष सत्तेत राहिला. प्रत्येक मंत्रीमंडळात सरमा यांना स्थान होते. ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही मानले जात होते. २०११ मध्ये पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देण्यात सरमा यांची प्रचंड मेहनतही कारणीभूत होती. पण गोगोई यांनी त्यांचे पुत्र व सध्याचे खासदार गौरव यांना पुढे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सरमा निराश झाले. त्यांनी पक्षातील गोगोई यांच्या विरोधकांना एकत्रित करून त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला. पण राहुल गांधी यांनी सरमा यांना मुख्यमंत्रीपदासाठी नाकारले. त्यामुळे पक्षावर नाराज झालेल्या सरमा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.

भाजपने हेरलं

आसामच्या विधानसभेच्या निवडणुका २०१६ मध्ये होणार होत्या. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली होती. त्यातच सरमा यांची नाराजी भाजपच्या पथ्यावर पडली. त्यांनी सरमा यांना पक्षात प्रवेश दिला. तिथेच आसामच्या सत्तापालटाची बीजे रोवली गेली. सरमा यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे १० आमदारही आले. त्यानंतर मात्र पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजप आघाडीला बहुमत मिळाले. तर सरमा यांना मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद मिळाले.

सरमा यांच्या भाजपमध्ये येण्याचा काँग्रेसला केवळ आसामच नव्हे तर ईशान्येकडील काही राज्यांमध्येही फटका बसला. इतर पक्षांशी मोट बांधत सरमा यांनी भाजपला या भागात मजबूत स्थितीत आणले. त्यामुळे सरमा यांच्या पक्षातील दबदबा वाढत गेला. तर काँग्रेसला मोठे राजकीय नुकसान सोसावे लागले. यंदाच्या निवडणुकीतही सरमा यांचा करिष्मा चालल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख