राज्यात सर्वाधिक दूध दर 'या' डेअरीचा   - The highest milk rate in the state is  dairy | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात सर्वाधिक दूध दर 'या' डेअरीचा  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सर्वाधिक दर देणाऱ्या "गोकुळ' च्या संचालकांचा सत्कार करावा, असे आव्हान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कोल्हापूर : राज्यात सर्वाधिक दूध दर "गोकुळ'कडून दिला जातोय. प्रत्येक वेळी राजकीय द्वेषानं पछाडलेल्या पालकमंत्र्यांनी आधी माहिती घ्यावी आणि सर्वाधिक दर देणाऱ्या "गोकुळ' च्या संचालकांचा सत्कार करावा, असे आव्हान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

दुध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपने केलेले आंदोलन म्हणजे केवळ स्टंट आहे, असा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. तर गोकुळनं शेतकऱ्याला जादा दर द्यावा, असेही आवाहन केलं. त्याला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. "आमचं ठरलंय' असे म्हणणाऱ्या टोळक्‍यानं आता पर जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांना आपल्या खाजगी रूग्णालयातून लुटमार करायचे ठरवलंय, असा टोलाही महाडिक यांनी हाणला. 

पालकमंत्र्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. कारण महाराष्ट्रातील सर्व दुध संघ 18 ते 20 रूपयांपर्यंत दुधाला दर देतात. पण गोकुळ 28 रूपये प्रति लिटर दर देते. त्यामुळे आधीच प्रति लिटर आठ रूपये जादा दर देणाऱ्या "गोकुळ' चा अभिमान बाळगून, पालकमंत्र्यांनी गोकुळच्या संचालकांचा सत्कार करण्याचं औदार्य दाखवावे, असे आव्हान महाडिक यांनी दिले.

 

पालकमंत्री म्हणून कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात त्यांना पूर्ण अपयश आलंय, असा आरोपही महाडिक यांनी केला. बेड उपलब्ध नसल्याने होणारे मृत्यू, अलगीकरण कक्षातील गैरसुविधा याबद्दल पालकमंत्री दुर्लक्ष करत आहेत. "आमचं ठरलंय' म्हणणारे टोळकं आता गायब झालं असून, त्यांना जनतेच्या अडीअडचणींची कसलीही पर्वा नाही, असा टोला महाडिक यांनी हाणला. कोरोनाच्या काळात खरेदी होणाऱ्या वस्तुंमध्ये त्यांचे लक्ष असून, पर जिल्हयातून येणारे नागरीक आपल्या खाजगी दवाखान्यात कसे जातील आणि त्यातून कशी मलई मिळवता येईल, याकडे त्यांचे लक्ष असल्याचा टोलाही महाडिक यांनी लगावला.
 Edited  by : Mangesh Mahale 

 

हेही वाचा : रोजगार गमावलेल्यांना काम मिळेल काय? 

मुंबई : राममंदिराचे भूमिपूजन होईल, राजस्थानात भाजपला हवे ते घडेल. फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी  'सामना'च्या  'रोखठोक'मधून विचारला आहे. कोरोनामुळे अनेकांवर आलेली बेरोजगारी, यावर उपाययोजना, राजस्थानमधील राजकीय़ उलथापालथ आदी विषयावर रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 

कोरोनामुळे दहा कोटी जणांच्य़ा नोकऱ्या गेल्या. तर 40 कोटी कुंटुबाच्या चुली विझल्या आहेत. यात सर्वात जास्त मध्यमवर्गीय कुंटुबातील नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांच्या प्रश्न केंद्र सरकार कधी सोडविणार ? अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होईल, राजस्थानात भाजपला हवे ते घडेल. फ्रान्सवरून राफेल विमानेही अंबालात उतरली. पण ज्यांनी या काळात नोकर्‍या गमावल्या त्यांचं नक्की कसं चाललंय, हे राज्यकर्ते कधी सांगतील काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख