"नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय..!'   - Hello I am speaking from Dhananjay Munde office  | Politics Marathi News - Sarkarnama

"नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय..!'  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयात सुरू केलेले 'कोरोना हेल्प सेंटर' रुग्णांसाठी दिलासा ठरत आहे.

परळी (जि. बीड) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी संपूर्ण ताकद लावून यंत्रणा कामाला लावणाऱ्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयात सुरू केलेले 'कोरोना हेल्प सेंटर' रुग्णांसाठी दिलासा ठरत आहे. 'हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली विचारपूस करण्यासाठी फोन केला आहे..' अशी विचारपूस करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी, रुग्णालयातील उपचार आणि जर रुग्ण खासगी रुग्णालयात असेल तर बिलाबाबत अडचणी देखील जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एखाद्या रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास तिथे बेड उपलब्ध करून देणे, विविध औषधोपचार उपलब्ध करून देणे यासह रुग्णांकडून येणाऱ्या तक्रारी आदी दूर करण्यासाठी या हेल्प सेंटर द्वारे मदत करण्यात येत आहे.
यासाठी धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या कार्यालयाच्या वतीने 'कोरोना हेल्प सेंटर' असा एक ग्रुप  तयार करण्यात आला आहे. याद्वारे २६ कर्मचारी मदत कार्य करत आहेत; स्वतः मुंडे देखील या ग्रुपचे सदस्य असून वेळोवेळी रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना देत असतात.

कुठल्याही रुग्णाने उपचारासंबंधी कोणतीही मागणी किंवा तक्रार केल्यास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध कोविड रुग्णालये, तेथील डॉक्टर्स, खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर आदी मोठ्या शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालये, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आदी महत्वाच्या व्यक्तीना संबंधित रुग्णांची तक्रार निवारण करण्यासंबंधी तातडीने कळविण्यात येते व संबंधित अडचण सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो.

या हेल्प सेंटरच्या माध्यमातून कोरोना मुक्त होऊन आलेल्या रुग्णांची देखील विचारपूस करण्यात येत असून, खाजगी रुग्णालयांमध्ये बिलांमध्ये सवलत मिळवून देणे, बिलाची रक्कम कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा अन्य तत्सम योजनांमधून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

'हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कळले, कशी आहे आता तब्येत... उपचारांमध्ये काही अडचण?' या स्वरूपाचे कॉल जिल्ह्यातील अनेक रुग्णांना आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या या अभिनव उपक्रमाचे कोरोना रुग्ण व नागरिकांनी कौतुक केले आहे.
 
दरम्यान जिल्ह्यात रुग्णसंख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध निघाले नाही, त्यामुळे रुग्ण घाबरलेले असतात. अशावेळी रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते. स्वतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या विभागाचे आमदारच आपली पालकत्वाच्या नात्याने एवढी काळजी करीत आहेत, त्यामुळे रुग्णांमध्ये ही समाधान व्यक्त होत आहे, अनेक रुग्णांना आपल्या या भावना सांगताना अनावर झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख