मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी टोपे यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी," असे टि्वट राजेश टोपे यांनी केले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन 'एसएमएस' चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असे टोपे यांनी टि्वट केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचं आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यात दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी टि्वटवरून दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो," असे टि्वट जयंत पाटील यांनी केलं आहे.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती खडसेंनी दिली होती. पण त्यावेळी दोन दिवसांनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ''माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो,'' असे ट्वीट आज खडसे यांनी केले आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा कोरोना रिपोर्ट १७ नोव्हेंबरला पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर नाथाभाऊ यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खानदेशचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता. माजी मंत्री खडसे यांची अँटिजेन आणि आरटीफीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे अहवाल तपासणी करण्यात आली त्यांचा अहवाल निगेटिव्ह मार्किंग आल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.आता ते मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

