मंत्र्यांना नव्हे आधी कर्मचाऱ्यांना लस..राज्याला कमी डोस मिळाले... - health minister rajesh tope alleges that maharashtra has received low doses for first phase vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्र्यांना नव्हे आधी कर्मचाऱ्यांना लस..राज्याला कमी डोस मिळाले...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले आहेत. राज्यात लसीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

मुंबई : सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. काल पुण्यातील सीरमने तयार केलेल्या लसींचे वितरण करण्यात आले. 

केंद्र सरकारने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. याबाबत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टोपे म्हणाले की राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाले आहेत. राज्यात लसीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. केंद्राने महाराष्ट्रातील केंद्राची संख्या कमी करून 350 केली आहे. या केंद्रामध्ये दिवसाला 20 ते 25 हजार जणांना लस दिली जाणार आहे. राज्याला केंद्राकडून 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. स्वतःच्या जीवापेक्षा इतरांच्या जीवांची काळजी महत्वाची आहे, मंत्र्यांना नव्हे तर आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी ही लस देण्यात येणार आहे.  

''कोरोना लसींचे दोन डोस घ्यायचे आहेत. ते एकाच कंपनीचे डोस असले पाहिजे. यासाठीची काळजी प्रशासन घेत आहे,'' असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्याला अपेक्षेपेक्षा कमी डोस मिळाल्याचा आरोप टोपे यांनी यावेळी केला. ता. 16 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या लसीकरण मोहिमेचे उद्धाटन सोशल मीडीयावरून करण्यात येणार आहे. 

देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या उत्साहात आणि तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केलं जात आहे. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. 

ता. 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.  

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख