कोरोनाला रोखणाऱ्या 'रॅाकस्टार' आरोग्यमंत्र्यांना मतदारांनी दिली विक्रमी मतं... - Health Minister k shailaja gets record break votes in assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

कोरोनाला रोखणाऱ्या 'रॅाकस्टार' आरोग्यमंत्र्यांना मतदारांनी दिली विक्रमी मतं...

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

शैलजा टीचर यांनी माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाकडून मत्तान्नुर मतदारसंघातून निवडणूक लढविली.

तिरअनंतपुरम : मागील वर्षी देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी परतल्यानंतर त्याची चाचणी पॅाझिटिव्ह आली होती. पण त्यानंतरही राज्यातील कोरोनाची पहिली लाट रोखण्यात केरळ सरकारला मोठं यश मिळालं. यामध्ये महत्वाचा वाटा होता तो, आरोग्यमंत्री के. शैलजा यांचा. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाने केरळला पहिल्या लाटेपासून दूर ठेवले. त्याचीच परतफेड करत केरळमधील मतदारांनी त्यांना विक्रमी मतांनी विजयी केले आहे. 

शैलजा टीचर यांनी माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाकडून मत्तान्नुर मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात रिव्हॅाल्युशनरी सोशालिस्ट पक्षाचे इलीकल अगस्थी हे उमेदवार होते. अन्य तीन उमेदवारही रिंगणात होते. पण शैलजा यांना तब्बल 96 हजारांहून अधिक मतं मिळाली. त्यांच्या जवळपासही कोणताही उमेदवार नाही. अगस्थी यांना केवळ 35 हजार मतं मिळाली असून शैलजा या 60 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडूण आल्या आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 61 टक्क्यांहून अधिक आहे. 

मागील निवडणुकीत केरळमध्ये सर्वाधिक मताधिक्य 45 हजारांच्या जवळपास होते. तर 2006 मध्ये हे मताधिक्य 47 हजार एवढे होते. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत शैलजा यांनी मताधिक्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनाही केवळ 40 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. 

शैलजा टीचर यांची कामगिरी

के. शैलजा यांच वय 64 असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी 25 वर्षांपुर्वी राजकारणात प्रवेश केला. केरळच्या आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक जागतिक पातळीवर झाले आहे. 2018 मध्ये केरळमध्ये निपाह विषाणुची साथ आली. त्यानंतर मागील वर्षी कोरोना संकट आले. या दोन्ही संकटांनी केरळच्या आरोग्य यंत्रणेची परीक्षा पाहिली. पण दोन्ही वेळेला शैलजा यांची दुरदृष्टी कामी आली. त्यामुळे त्यांना रॅाकस्टार आरोग्यमंत्री म्हणूनही केरळमध्ये ओळखले जाते. या निवडणुकीत त्या विजयी होतील, असा विश्वास सर्वांनाच होता. पण त्यांना मिळालेले मताधिक्य हे त्यांच्या कामाचे मतदारांनी केलेले कौतुक असल्याची चर्चा केरळमध्ये रंगली आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात मात्र, त्यांना अपयश आल्याचे दिसते. महाराष्ट्रानंतर देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळून आले. पण याच कालावधीत विधानसभेच्या निवडणुका असल्याने त्यांनाही अनेक मर्यादा आल्या. असे असले तरी त्यांनी बसविलेल्या आरोग्य यंत्रणेच्या घडीमुळे केरळचा मृत्यूदर सर्वात कमी 0.4 टक्के एवढाच आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख