हर्षवर्धन पाटलांनी दुसऱ्यांदा घेतली राज्यपालांची भेट  - Harshvardhan Patil met the Governor for the second time | Politics Marathi News - Sarkarnama

हर्षवर्धन पाटलांनी दुसऱ्यांदा घेतली राज्यपालांची भेट 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 6 सप्टेंबर 2020

हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेस पक्षात बडे नेते म्हणून ओळखले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

इंदापूर (जि. पुणे) : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारून भगतसिंह कोश्‍यारी यांना 5 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याबद्दल राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत राजभवन येथे कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. 

या वेळी पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा जिल्हा परिषद सदस्या अंकिता, त्यांचा मुलगा, नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे उपस्थित होते. पाटील यांनी या वेळी राज्यपाल कोश्‍यारी यांना काही पुस्तके आणि ग्रंथ भेट दिले आहेत. 

दरम्यान, या पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्या वेळीही पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांसोबत त्यांच्या कन्या अंकिता पाटील उपस्थित होत्या. महिनाभराच्या अंतरात ते दुसऱ्यांदा कोश्‍यारी यांना भेटले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राज्यपालांच्या वाढत्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कोविड परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात व इतर विषयांसंदर्भातील विद्यार्थ्यांच्या समस्या राज्यपाल कोश्‍यारी यांच्यासमोर मांडल्या. राजवर्धन पाटील यांनी युवा पिढी सक्षमीकरण या कडे राज्यपालांचे लक्ष वेधले. या दोन्ही विषयांवर कोश्‍यारी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. 

विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे, तसेच युवापिढी सबलीकरणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन कोश्‍यारी यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेस पक्षात बडे नेते म्हणून ओळखले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती. 

हेही वाचा : कृष्णप्रकाश साहेब...चाकण एमआयडीसीतील व्हाईट कॉलरवाल्यांकडे एकदा बघाच 

चाकण (जि. पुणे) : पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच "मी असेपर्यंत व्हाईट कलर गुन्हेगारांनी दुसरा धंदा शोधावा, अन्यथा मी आहेच,' असा इशारा दिला होता. कृष्ण प्रकाश यांच्या व्हाईट गुन्हेगारी मोडून काढण्याच्या घोषणेचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे.

तसेच, कृष्ण प्रकाश साहेब...चाकण औद्योगिक वसाहतीतील व्हाईट कॉलरवाल्यांकडे एकदा बघाच, अशी विनंतीही खेड तालुक्‍यातील विशेषतः चाकण परिसरातून होत आहे. 

संदीप बिष्णोई यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी सकाळीच पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी व्हाईट कॉलर गुन्हेगारांना धमकावतानाच सर्वसामान्यांसाठी मात्र आपले कार्यालय नेहमी उघडे असेल, असे सांगितले होते.

त्यांच्या या घोषणेचे चाकण औद्योगिक वसाहतीतून स्वागत होत आहे. कृष्ण प्रकाश यांच्या या घोषणेमुळे व्हाईट कॉलर गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख