जामिनासाठी हरिश साळवे मैदानात...पण अर्णव गोस्वामींची दुसरी रात्रही तुरुंगात - harish salve represents Arnab Goswami in HC for bail application | Politics Marathi News - Sarkarnama

जामिनासाठी हरिश साळवे मैदानात...पण अर्णव गोस्वामींची दुसरी रात्रही तुरुंगात

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

तक्रारदार अक्षता नाईक आणि राज्य सरकारची बाजूही ऐकायला हवी. त्याशिवाय जामिनावर निर्णय देता येणार नाही. याचिकादार हवे तर रिमांडला आव्हान देऊ शकतात, असे खंडपीठ म्हणाले.

अलिबाग : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा मिळाला नाही. अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर राज्य सरकार आणि तक्रारदाराची बाजू ऐकल्यानंतरच निर्णय घेता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे अर्णब यांना दुसरी रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागली असून त्यांच्या जामीन अर्जावर आता सहा नोव्हेंबर रोजी  दुपारी तीन वाजता पुढील सुनावणी होणार आहे.

गोस्वामी यांना बुधवारी (ता. 4) अटक केल्यानंतर अलिबाग न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.
अन्वय नाईक आत्मत्या प्रकरणात पुराव्यांअभावी पोलिसांनीच "ए समरी' अहवाल दाखल करत प्रकरण बंद केले होते.

त्याला पोलीस किंवा तक्रारदारानेही आव्हान दिले नाही. तसेच, गोस्वामी यांच्यावर झालेली अटकेची कारवाईदेखील न्यायालयाच्या परवानगीशिवाय करण्यात आली आहे. त्यामुळे ती अवैध आहे, असा युक्तिवाद गोस्वामींच्या वतीने ऍड. आबाद पोंडा यांनी केला. तर, गोस्वामी हे पत्रकार असून त्यांची सुटका होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आता जामीन मंजूर करून मग सुनावणी घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केली; मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. याचिकेत तक्रारदार अक्षता नाईक आणि राज्य सरकारची बाजूही ऐकायला हवी. त्याशिवाय जामिनावर निर्णय देता येणार नाही. याचिकादार हवे तर रिमांडला आव्हान देऊ शकतात, असे खंडपीठ म्हणाले. गोस्वामी यांच्यासह अटकेत असलेल्या अन्य दोन आरोपींनीही कारवाईविरोधात याचिका केली असून त्यावरही उद्या सुनावणी होणार आहे.

"ए समरी' अहवालाला आव्हान
सन 2019 मध्ये पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाबाबत ए समरी अहवाल सादर करत प्रकरण बंद केले होते. याविरोधात अन्वय नाईक यांची मुलगी आद्या नाईक यांनीही उच्च न्यायालयात याचिका केली असून या अहवालाला आव्हान दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख