मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांमध्ये समझोता करायला गेलेले नेतेच अडकले वादात

आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याचे लक्षात येताच रावत यांनी त्यावरून माफीही मागितली आहे
Harish Rawat apologize over panj pyare comment
Harish Rawat apologize over panj pyare comment

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्यात अजूनही शीतयुध्द सुरू आहे. सिध्दू यांच्याकडून सतत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे. आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोघांमध्ये समझोता करायला गेले अन् त्यांनीच वाद ओढवून घेतला आहे. (Harish Rawat apologize over panj pyare comment)

रावत हे मंगळवारी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सिध्दू आणि त्यांच्या चार कार्यकारी अध्यक्षांची तुलना शीख धर्मातील महान 'पंज प्यारे' यांच्याशी केली अन् तिथंच वादाची ठिणगी पडली. या वक्तव्यावरून विरोधकांनी रावत यांच्यावर सडकून टीका केली आहे. शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप अकाली दलने केला आहे.

आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याचे लक्षात येताच रावत यांनी त्यावरून माफीही मागितली आहे. ते म्हणाले, आदर व्यक्त करताना कधीतरी आपण अशा शब्दांचा वापर करतो ज्यावरून वाद निर्माण होतो. माझ्याकडूनही प्रदेशाध्यक्ष व चार कार्यकारी अध्यक्षांसाठी 'पंज प्यारे' हा शब्द वापरण्याची चूक झाली आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी असून 'पंज प्यारे'ची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. माझ्याकडून ही चूक झाली असून मी सर्वांची माफी मागतो, असं रावत यांनी म्हटलं आहे.

काय आहे 'पंज प्यारे'चे महत्व?

गुरू गोविंद सिंग यांनी शीख धर्माची स्थापना केली त्यावेळी त्यांनी पाच प्यारे म्हणजे पाच लोकांची निवड केली होती. गुरू आणि धर्मासाठी ते काहीही करू शकतात. धर्मासाठी आपल्या प्राणांचाही त्याग करू शकतात. त्यानंतर शीख धर्मामध्ये कोणतीही यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रम असल्यास तिथे पंज प्यारे त्याचे नेतृत्व करतात. त्यांना खूपच पवित्र मानलं जातं, अशी मान्यता शीख धर्मात आहे. 

रावत यांच्या वक्तव्यानंतर पंजाबमध्ये अकाली दलाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागण्याची विनंती केली होती. रावत यांनी जाहीर माफी मागितल्यानं या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रावत यांनी नुकतंच पंजाब प्रभारी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मागील काही महिन्यांपासून ते मुख्यमंत्री व सिध्दू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com