कट्टर राजकीय विरोधक या कारणासाठी आले एकत्र - Hardline political opponents came together for this purpose | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

कट्टर राजकीय विरोधक या कारणासाठी आले एकत्र

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिला होता.

दाभोळ : एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय कदम हे रत्नागिरी येथे प्रस्तावित असलेले मेडीकल कॉलेज दापोलीत सुरू करण्यात यावे या मुद्यावर मात्र एकत्र आले आहेत. तशी मागणीच या आजी माजी आमदारांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे शुक्रवारी (ता. २० नोव्हेंबर) दापोली दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे योगेश कदम आणि संजय कदम या आजी माजी आमदारांनी वरील मागणी केली. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राजेश टोपे यांनी दिले. 

सिंधुदुर्ग, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी मेडीकल कॉलेज मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे मेडीकल कॉलेज रत्नागिरी तालुक्‍यात होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रयत्नशील आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे येऊन मेडीकल कॉलेजसाठी जागेची पाहणीही केली होती. मात्र, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन प्रस्तावित मेडीकल कॉलेजच्या जागांमध्ये 150 किलोमीटरचे अंतरही नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे मेडीकल कॉलेज दापोली येथे करावे अशी मागणी आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे केली आहे. 

यावर आपण त्यासाठी निवेदन द्या. ते प्रोसेस करण्यात येईल व त्यानंतर या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले आहे. आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. 

आता रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडीकल कॉलेजसाठी रत्नागिरी व दापोली यांच्यात चुरस निर्माण झाली असून आता बाजी कोण मारणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे मतदारसंघातील विकास कामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमास आपल्याला बोलावत नाहीत, असे सांगून त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिला होता. त्यावरून दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. आता मात्र मेडिकल कॉलेजच्या मद्यावर मात्र ते एक झाले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकण दौऱ्यात तटकरे यांची पाठराखण करत शिवसेनेचे आमदार कदम यांना कानपिचक्‍या दिल्या होत्या. याशिवाय माजी आमदार संजय कदम यांनीही कदमांवर कठोर भाषेत टीका केली होती. त्यामुळे काही दिवसांपर्यंत एकमेकांवर तुटून पडणारे हे आजी माजी आमदार आज मात्र मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने एकत्र आले होते. 

विशेष म्हणजे आमदार योगेश कदम यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांविरोधात भूमिका घेत मेडिकल कॉलेज रत्नागिरीऐवजी दापोलीत करावे, अशी मागणी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख