बैठकीला अर्धा डझन मंत्री.. पण, ठोस निर्णय नाही..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री पुण्यातील बैठकीला हजर असतानाही कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत.
4Ajit_20Pawar_Uddhav_20Thackeray.jpg
4Ajit_20Pawar_Uddhav_20Thackeray.jpg

पुणे : पुणे जिल्ह्यात एकूण 81 हजारांवर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा दोन हजारांच्या आसपास गेला आहे. दररोज सरासरी पंचवीस ते तीस लोकांचा मृत्यू होत आहे. अशी गंभीर स्थिती असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री पुण्यातील बैठकीला हजर असतानाही कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत, त्यामुळे पुणेकरांची निराशा झाली.

पुणेकरांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागेल..

मुख्यमंत्री, अर्थमंत्री या बैठकीस उपस्थित होते, त्यामुळे त्यांना तातडीने निधीची घोषणा करता आली असती, पण ते झाले नाही. 'जम्बो हाॅस्पिटल उभारा',  'पुणेकरांनो गाफील राहू नका', 'ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवा', आदी मोघम सूचना फक्त मुख्यमंत्र्यांनी केल्या.राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असणाऱ्या पुण्यात हे संकट रोखण्यासाठी काहीतरी 'अॅक्शन प्लॅन' ठरण्याची आवश्यकता होती, मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठकी पूर्वीच लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. यात लोकप्रतिनिधींनी अडचणींचा पाढा वाचला. पण बैठकीतून सध्यातरी  फारसे काही हाती लागले नाही. मुख्यमंत्री पुण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करेल असे अपेक्षित आहे, तोपर्यंत पुणेकरांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागेल, हे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.

रुग्णांच्या आकडेवारी वरून गोंधळ

राज्याचे स्टेरिंग माझ्याच हाती आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री गाडी चालवत आले खरे, पण ज्या कारणासाठी पुण्यात आले त्याबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा आदेश न करताच ते मुंबईला परत गेलेही. त्यामुळे पुणेकरांच्या पदरी निराशाच पडली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच शहरातील सुमारे एक हजार मृत्यूंची कोरोना बळी म्हणून नोंदच झाली नाही, असा गौप्यस्फोट केला आणि प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळ चव्हाट्यावर आणला. पुण्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची जाणीव वारंवार सर्व यंत्रणांनी करून दिली होती. प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले.  प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या आकडेवारी वरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन होत नसल्याचेही ही बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. त्यावरही तातडीने निर्णय होऊन प्रशासकीय पातळीवर सुधारणा करण्याचे आदेश अपेक्षित होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येपासून अनेक विषय प्रलंबित आहेत, त्याबाबतही या बैठकीत लक्ष दिले गेले नाही. 


केवळ सूचनांची खैरात

कोरोनाशी लढा देण्यासाठी पुण्यात डझनाहून अधिक वरिष्ठ 'आयएएस' अधिकारी नेमून झाले, तरीही ही पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वांच्या आशा मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत इकडे लागल्या होत्या. मुंबईत कोरोनाचे संकट सर्वाधिक गडद असतानाही त्या ठिकाणी नियंत्रण मिळविण्यात यश आले. हाच अनुभव पाठीशी घेऊन मुख्यमंत्री पुण्यात तातडीने निर्णय घेतील,  प्रशासकीय यंत्रणेला  अॅक्शन प्लॅन देतील, आवश्यक तेथे तातडीने आर्थिक मदत जाहीर करतील, पुणेकरांना धीर देतील असे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ सूचनांची खैरात केली. पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी महापौरांनी केली होती. 


या बैठकीस 'कार्यक्षम' पालकमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे या वेळी उपस्थित होते. 

Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com