ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार.. - Gram Panchayat Election Program Will be newly announced  Election Commissioner U. P. S. Madan | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. 

मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. 

विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या दिनांकावर आधारित होती; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या तारखेपर्यंत आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा : सरकारी कामांमधील दिंरगाई हद्दपार करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल..
दिल्ली : विविध मंत्रालयांच्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी त्या त्या योजनेची जबाबदारी निश्‍चित करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व मंत्रालयांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात पायाभूत योजनांची कामे ठरलेल्या मुदतीतच पूर्ण करण्यावर कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारी कामांमधील लेटलतीफी हद्दपार करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या पत्राची भाषाही कडकपणे व समज देण्याच्या धर्तीची आहे. सध्या चालू असलेल्या व यापूर्वीच्या पण प्रलंबित असलेल्या योजनांबाबत निश्‍चित वेळापत्रक आखावे. काम पूर्ण होण्यास विलंब झाला तर कडक पावले उचलावीत व त्यांच्या कामांची जबाबदारी निश्‍चित करावी, असे सांगून पत्रात म्हटले आहे की कोणत्याही योजनेला विलंब झाला तर लागणारा वेळ व पैसा देशाच्या विकासातच अडथळा ठरतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख