पिंपरी : राज्याच्या ग्रामीण भागातील १४,२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील महिन्यात होत आहे. मात्र, त्याचा काहीसा फटका शहरालाही बसणार आहे. त्यातही ग्रामपंचायतीला लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर निर्बंध आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही काम वा भाष्य स्थानिक स्वराज्य संस्थांत करता येणार नाही. तसा आदेशच राज्य निवडणूक आय़ोगाने काल काढला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेतून नुकत्याच सुटलेल्या पिंपरी-चिंचवडसारख्या ग्रामीण भाग असलेल्या महापालिकांच्या विकासात्मक निर्णयांना पुन्हा काहीशी खीळ बसणार आहे. त्यातही गावे तथा ग्रामपंचायतीला लागून असलेल्या नगरपरिषदा व नगरपालिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. ११ तारखेला राज्य निवडणूक आय़ोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानंतर लगेच या निवडणुकीची आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू आहे किंवा कसे अशी चर्चा सुरु झाली. त्याबाबत निवडणूक आयोगाकडेच विचारणा झाली. त्यामुळे आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काल त्याबाबत वरील खुलासा केला आहे. ग्रामीण भागात ही निवडणूक असल्याने त्याची आचारसंहिता शहरी भागात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांत राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ग्रामपंचायतीच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती वा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसे त्यांनी सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना कळवले आहे.
ग्रामपंचायतीचा धुराळा ! थोरात-विखे गटात पुन्हा राजकीय युद्ध https://t.co/UyT2Wgqc9f
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 18, 2020
श्रावण हर्डीकरांच्या बदलीची शक्यता..
पिंपरी : अपर जिल्हाधिकारी दर्जाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीवर पुण्यात बदली झाली आहे. राज्यातील इतर सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे. पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचेही वारे आता जोरात वाहू लागले आहेत. त्यांचीही कधीही बदली होऊ शकते. अपर जिल्हाधिकारी (गट अ) संवर्गातील पाटील व इतर सहा अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या श्रेणीत बढती देण्यात आली आहे. पाटील यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सामान्य) या पदावर झाली आहे. त्याखेरीज भानूदास पालवे (अपर आय़ुक्त, नाशिक), अविनाश पाठक (अपर आय़ुक्त, औंरगाबाद), प्रवीणकुमार देवरे (उपआय़ुक्त, नाशिक), मिलिंद साळवे (उपायुक्त, महसूल, नागपूर), मकरंद देशमुख (उपायुक्त, कोकण, नवी मुंबई) आणि भारत बास्टेवाड (अध्यक्ष, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, रायगड) या अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे.

