दिवे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागला. यात दिवे ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजप नेते बाबाराजे जाधवराव यांनी काँग्रेसजनांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या संमिश्र पॅनलचा दारुण पराभव केला. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या पॅनेलचा पराभव झाला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संभाजी झेंडे हे मेव्हणे आहेत.
या निकालाबाबत बाबाराजे जाधव म्हणाले, "हा धनशक्ती विरूद्ध जनशक्तींचा विजय आहे. गेल्या 50 वर्षापासून या ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आहे. लोकांनी विकासकामांना व विकास कामे करणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यामध्ये विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या लोकांच्या पाठीमागे मतदार ठामपणे उभी राहिली. ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते आदी कामांना प्राधान्य दिले.
हर्षवर्धन पाटलांचे स्वप्न अधुरेच; राज्यमंत्री भरणेंचे भरणेवाडीत निर्विवाद वर्चस्व https://t.co/cXvEHB1xQ4
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 18, 2021
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते संभाजी झेंडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात अनुक्रमे पिसर्वे, वाळुंज, दिवे गावात पराभव झाला.
शिवसेना तालुका प्रमुख दिलीप यादव म्हणाले, "पुरंदर तालुक्यात शिवसेनेने सर्वाधिक २० ग्रामपंचायती स्वबळावर जिंकल्या तर युतीद्वारे ५ ग्रामपंचायती जिंकल्या. ५५ पैकी २५ ग्रामपंचायतीत शिवसेना सत्तेत आली. म्हणजेच जवळपास ५० टक्के गावं एकट्या शिवसेनेने जिंकली आहेत." पुरंदर तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत आपणच सर्वाधिक जागा जिंकून तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्याच्या दावा सर्वच पक्षांच्या प्रमुख मंडळीकडून केला जात आहे.
हेही वाचा : मावसभावांच्या लढतीत पवारांनी मारली बाजी...
शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी सभापती प्रकाश पवार व जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. ४:५ अशा बलाबलाने निवडणूक जिंकलेल्या या निवडणूकीत पवारांच्या पॅनलने शिरुरचे माजी सभापती सुभाष उमाप यांच्या पॅनलचा पराभव केला.
पवार व उमाप हे दोघेही सख्खे मावसभाऊ आहेत.दोन्ही परिवार राष्ट्रवादीशी कट्टर मात्र यावेळी पवार आणि उमाप अशाच पध्दतीने गावात ग्रामपंचायत निवडणूक लढविली गेली. यात उमाप यांच्या जय हनुमान पॅनल तर पवार समर्थकांचा गुरुदत्त ग्रामविकास पॅनल होते. गावात सुनंदा सुनिल होळकर या शिवसेनेच्या सदस्या निवडणूकीपूर्वीच बिनविरोध झाल्या. त्यामुळे आठ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ४:४ असे बलाबल राहिले. मात्र, शिवसेनेच्या होळकर कुटुंबीयांनी सर्व निकाल जाहीर होताच आपला पाठींबा पवार गटाला जाहीर केल्याने निवडणूकीत पवार पॅनलने आपले वर्चस्व सिध्द केले.

