MPSC ची 11 आॅक्टोबरची परीक्षा रद्द करण्यास सरकार अनुकूल : मेटे - govt ready to cancel MPSC examination says Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama

MPSC ची 11 आॅक्टोबरची परीक्षा रद्द करण्यास सरकार अनुकूल : मेटे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

विद्यार्थ्यांची परीक्षेसाठीची वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याचा प्रस्ताव

मुंबई : मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे सरकारी नोकरभरती आणि परीक्षा पुढे ढकलण्याच्या मराठा संघटनांच्या मागणीला सरकार अनुकूल असल्याचे दिसून आले आहे. येत्या रविवारी (ता. 11 आॅक्टोबर) रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध संघटनांची बैठक बोलविली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, इतर सचिव उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे, विनायक मेटे यांच्यासह इतर मराठा संघटनांचे प्रतिनिधीही या वेळी हजर होते. नवी मुंबई येथे काल झालेल्या मेळाव्यातच संभाजीराजे यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नका, परीक्षा रद्द करा असा इशारा दिला होता. या इशाऱ्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. कोरोनामुळे ही परीक्षा विलंबाने होत होती. ती आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठीचा अंतिम निर्णय रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. 

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मेटे यांनी सांगितले की दीडदोन तास 20 मुद्द्यावर चर्चा झाली. येत्या ११ तारखेची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी. एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी, यावर मते मांडण्यात आली. मराठा आरक्षणावर स्थगिती आहे. मराठा तरुणांनी नोकरी संदर्भात अर्ज कसे भरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचे म्हणणे सरकारला पटले आहे. परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. यासाठीचा निर्णय आजच घ्यावा लागणार आहे. 

छावा संघटनेचा परीेक्षेला विरोध नाही, पण..

गुणवंत मराठा तरुणांसह इतर जातींच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होउ नये. त्यासाठी परीक्षा झाल्या पाहिजे यासह उद्याच्या परिक्षेला छावा संघटन सुरक्षा देणार असल्याचं मत छावाने व्यक्त केले आहे. इतर जातीचं नुकसान करून आम्हाला आरक्षण नको , मात्र नोकर भरतीला आमचा विरोध कायम असल्याचं देखील छावाच्या वतीनं लातूर येथे सांगण्यात आले. दुसरीकडे आम्ही 11 तारखेला MPSC कार्यालय फोडणारच, अशी भूमिका मराठा क्रांती रोखठोक मोर्चाने आज परळीत घेतली. `छावा`च्या नानासाहेब जावळे पाटील यांच्या प्रतिक्रियावर आंदोलनकर्ते संतापले आहेत. जावळे पाटील यांनी सुरक्षा द्यावी, आम्ही आमचं काम करू, असाही इशारा देण्यात आला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख