कठोर लाॅकडाऊनची तयारी सुरू : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या... - govt postpones examination of SSC and HSC due to covid situation | Politics Marathi News - Sarkarnama

कठोर लाॅकडाऊनची तयारी सुरू : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

इतर परीक्षांबाबतही लवकरच निर्णय 

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यँत लॉकडाऊन राहणार आहे. जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर हा कालावधी अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा पुढे गेल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई आदी शिक्षण मंडळांनीही आपापल्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांच्याशी परीक्षांबाबत चर्चा आज केली. त्यानंतर त्यांनी निर्णय जाहीर केला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आधीच वरच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय झाला आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निर्णय प्रलंबित आहे. नव्या घोषणेनुसार दहावीची परीक्षा जून महिन्याच्या प्रारंभी तर बारावीची परिक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे.  बारावीच्या परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होणार होत्या त्या आता मे महिन्याच्या अखेरीस होतील. दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल पासून होणार होत्या,त्या आता जून महिन्याच्या प्रारंभी घेण्यात येणार आहे.

राज्यात वेळीच लॉकडाऊन केले नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यामुळे राज्य सरकार लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. जवळपास सर्वच मंत्र्यांनी लाॅकडाऊन अटळ असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ आल्याने सारेच धास्तावले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्याही परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

याबाबत वैद्यकीय शिक्षणंत्री अमित देशमुख म्हणाले की लॉकडाऊन संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील.  त्यांनी विरोधी पक्षनेते तसेच टास्क फोर्स या सर्वांशी चर्चा केलेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. पंधरा दिवस आधी जी स्थिती होती ती आता राहिलेली नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती बिकट होतय. त्यामुळे लोक डाऊन सारखा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.   कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून प्राण वाचावा की प्रपंच हे आता आपल्याला ठरवावे लागेल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आदींनीही लाॅकडाऊन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. व्यापाऱ्यांचा कडक लाॅकडाऊनला विरोध आहे. हे लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी संयमाने घ्यावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख