मोठी बातमी : कोरोनाचा कहर थांबेना; संपूर्ण राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

जिल्हानिहाय लाॅकडाऊन लागू करण्याच्या सूचना
Uddhav_Thackeray
Uddhav_Thackeray

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या कमी होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कठोर निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार येत्या रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठीचे आदेश आजच जारी करण्यात येणार आहेत.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.

ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य मंत्री राजेश टोपे,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड,मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी  बैठकीस उपस्थित होते.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण...
 मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  

खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी,  गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com