राज्यपाल कोटा आमदार : त्या बारा नावांचा लिफाफा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त - Governor quota mlc : Envelope of those twelve names handed over to the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल कोटा आमदार : त्या बारा नावांचा लिफाफा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

राजू सोनवणे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

काँग्रेसकडून साहित्यिक अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे.

मुंबई : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमावयाच्या बारा नावांना आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाआघाडी सरकारमधील प्रत्येक पक्षाला चार आमदार यात नेमता येणार आहेत. ही नावे गोपनीय ठेवण्यात आली असून त्याचा लिफाफा मु्ख्यमंत्र्यांकडे देण्यात आला.

या नावांविषयी फार वाच्यता नको आणि त्यातून पुन्हा पक्षांतर्गत वाद नको, त्यामुळे ती गोपनीय ठेवून थेट राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहेत. कला, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील नावांचा राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी विचार करावा, असा संकेत आहे. मात्र त्यात अनेकदा राजकीय नावेच पाठवली जातात. या लिफाफ्यात जर राजकीय नावे असतील तर त्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मान्यता देणार का, याची उत्सुकता आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा पुन्हा वाद सुरू होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

या बारा नावांना मान्यता मिळाल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र नावे जाहीर करण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. 

शिवसेनेकडून अभिनेता सुबोध भावे, आदेश बांदेकर, समाजसेविका सिंधूताई सपकाळ, वरुण सरदेसाई, राहुल कलान यांची नावे चर्चेत आहेत. 

काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे. अनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार आहेत. राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी, एकनाथ खडसे किंवा त्यांच्या कन्या रोहिणी, गायक आनंद शिंदे आदी नावे आघाडीवर आहेत. प्रत्यक्षात खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. 

आज २९ ऑक्टोबर २०२० मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

शिवभोजन थाळीचा दर दि.०१ ऑक्टोबर २०२० पासून पुढील ६ महिन्यांसाठी ५ रुपये करण्यास मान्यता.

मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार. अध्यादेश काढण्यास मान्यता

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार

राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व  औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता.

राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना 

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार 

मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख