शरद पवारांच्या टोमण्याला राज्यपालांचे असे उत्तर - Governor Bhagat Singh Koshyari reply to Sharad Pawar's taunts | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या टोमण्याला राज्यपालांचे असे उत्तर

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

राज्यपाल कोश्‍यारी हेही कसलेले राजकारणी असून चालून आलेली संधी तेही कसे सोडतील.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज वाढीव वीजबिलाचा प्रश्‍न राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या दरबारात उपस्थित केला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोला, असा सल्ला दिल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवारांनी काल कोश्‍यारींना पत्रातून जे चिमटे घेतले होते आणि टोमणे मारले होते, त्याला राज्यपालांनी अशा प्रकारे उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल कोश्‍यारी यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याच्या मुद्यापासून राज्यपालांनी ठाकरे सरकारला टोकायला सुरुवात केली होती.

राज्यातील मंदिरे उघडण्यावरून कोश्‍यारी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित त्यांचे हिंदुत्व काढले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खास ठाकरी शैलीत उत्तर दिले होते. त्याच मुद्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून कोश्‍यारी-पवार यांच्यात राजकीय टोमणे मारायला सुरूवात झाली होती. 

गृहमंत्री शहा यांनीही राज्यपाल कोश्‍यारी यांनी पत्रात अशी भाषा वापरायला नको होती, असे एका मुलाखतीत कबूल केले होते. हा मुद्दा सोडतील ते पवार कसले? त्यांनीही खास मराठी म्हणीचा आणि पुणेरी भाषेचा वापर करत "शहाणाला शब्दांचा मार' म्हणत "ते (राज्यपाल कोश्‍यारी) अजून पदावर कसे?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. 

राज्य सरकारच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेले "जनराज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी' हे चित्ररूप कॉफी टेबलबुक शरद पवार यांना पाठविण्यात आले होते. या पुस्तकावरूनही पवारांनी कोश्‍यारी यांना पत्र लिहीत पुणेरी टोमणे मारले होते. त्याचीही चर्चा होती. 

पुस्तकाच्या शीर्षकावरूनच राज्यपालांना चिमटा काढला होता. भारतीय संविधानात "जनराज्यपाल' असा उल्लेख आढळत नाही. आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे "स्वप्रसिद्ध' कॉफी टेबल बुक म्हणत टोमणे मारले होते. तसेच, निधर्मवादासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसत नाही, असा टोला पवारांनी पत्रातून लगावला होता. 

राज्यपाल कोश्‍यारी हेही कसलेले राजकारणी असून चालून आलेली संधी तेही कसे सोडतील. राज ठाकरे यांच्या भेटीच्या निमित्ताने त्यांनी ती संधी साधली. राज हे आज आपल्या पक्षाच्या शिष्टमंडळासह कोश्‍यारी यांना वाढीव विजबिलाच्या मुद्यावरून भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी हा मुद्दा शरद पवार यांच्याही कानावर घाला, असा सल्ला देत कोश्‍यारी यांनी आपला बाणा कायम राखला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख