मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार राहील  - The government will be responsible if there is an outbreak of Maratha community | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार राहील 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 20 सप्टेंबर 2020

आरक्षणाच्या मुद्यावर आज मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व अन्य मराठा संघटनांतर्फे शहरात दहीसर, घाटकोपर, परळ, वडाळा, चेंबूर, जोगेश्वरी, दादर आदी अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलने करण्यात आली.

मुंबई : मराठा समाजाने आज (ता. 20 सप्टेंबर) शांततापूर्ण आंदोलन केले आहे, मात्र आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल व त्यास फक्त सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजन घाग यांनी लालबाग येथील आंदोलनादरम्यान दिला. 

आरक्षणाच्या मुद्यावर आज मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व अन्य मराठा संघटनांतर्फे शहरात दहीसर, घाटकोपर, परळ, वडाळा, चेंबूर, जोगेश्वरी, दादर आदी अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलने करण्यात आली. सोमवारीदेखील (ता. 21 सप्टेंबर) आमदार-खासदार आदी काही लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. 

फलक, भगवे ध्वज हाती घेतलेले कित्येक कार्यकर्ते लालबाग येथील आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्तेही सहभागी होते. जमावबंदी आदेश असल्याने येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी आंदोलक महिलांनी स्थानिक आमदार अजय चौधरी यांना मागण्यांचे निवेदनही दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. ही स्थगिती तत्काळ उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, एकही मराठा तरुण शिक्षणाशिवाय किंवा नोकरीशिवाय राहता कामा नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने पोलिसांची वा अन्य नोकरभरती करू नये, अशी नोकरभरती आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आज शांततेत आंदोलन केले आहे, मात्र मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास केवळ सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक घाग यांनी दिला. 

मुंबईत आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी घोषणा देत आंदोलने करण्यात आली. यापुढील आंदोलन दिल्लीतच होईल, असा इशारा जोगेश्वरी येथील आंदोलनात सहदेव सावंत यांनी दिला. दादरचे शिवाजी मंदिर हे मराठा आंदोलनाचे केंद्र झाले आहे, तेथेही आज जोरदार आंदोलन झाले. कित्येक मूकमोर्चे तसेच अनेक बलिदानांनंतर मिळालेले आरक्षण टिकलेच पाहिजे, असेही या वेळी सांगण्यात आले.

सोमवारी सकाळी गोरेगाव येथे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर व दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांच्या निवासस्थानावर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे घंटानाद आंदोलन केले जाईल. राज्यातील नोकरभरती थांबवावी, तसेच मराठा विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क सरकारने भरावे या मागण्यांसाठी हे आंदोलन होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख