सरकारची नवी योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी.." सोमय्यांचा टोला  - Government  new plan My light bill is my responsibility | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारची नवी योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी.." सोमय्यांचा टोला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई :  'वाढीव वीज बिल भरू नका,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना काल केलं आहे. वाढीव बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात आहे. वाढीव बिलाबाबत राज्य सरकारनं सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा, अनथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाढीव वीज बिलांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

किरिट सोमय्या यांनी याबाबत टि्वट केले आहे.  सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो शेअर केला आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी,” असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकारांने पाठविले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

काल पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर म्हणाले, "वाढीव बिलाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संवाद साधला होता. शरद पवार यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. पण शरद पवार यांच्या शब्दाला राज्य सरकारध्ये किंमत नसल्याचे दिसते. याबाबत शरद पवार यांनी सरकारला आदेश दिला पाहिजे."

'सोमवारपर्यंत कुणीही वाढीव वीज बिल भरू नये,' असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदगावकर  सांगितले. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये श्रेयवादांची लढाई सुरू आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.    

'सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, ' असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख