मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करत ते अनुकंपा तत्वावर राजकारणात आल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी ते आज सांगलीत दुपारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला हजर होते. तोपर्यंत तर ठीक होते, असे मिश्किल उत्तर दिले.
पाटील यांनी आज राष्ट्रवादी संवाद यात्रेची घोषणा केली. यात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला. पडळकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना पाटील यांच्यावर तोफ डागली. त्यावर पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. पडळकर हे माझ्या राजकारणातील एंट्रीबद्दल बोलले असतील, असे म्हणत त्यात टीका कोठे आहे, अशी विचारणा केली. तरी पत्रकारांनी तोच प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाच्या वक्तव्यावर काय बोलायचे? आज दुपारी ते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सांगलीला होते. तेव्हा तर ठीक होते, असे म्हणत त्यावरील अधिक भाष्य टाळले.
जयंत पाटील यांची यात्रा येत्या 28 जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तिची सांगता होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हा प्रमुख हेतू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. १७ दिवसांचा पहिला टप्पा असणार आहे. त्यात विदर्भ, खानदेशातले १४ जिल्ह्यात आम्ही जाणार आहोत. १३ फेब्रुवारीला या यात्रेचा समारोप होईल

