ऊस तोड कामगारांच्या प्रश्नावर भाजप आमदाराने उठवले रान - Gopichand Padalkar agitation on the issue of sugarcane workers | Politics Marathi News - Sarkarnama

ऊस तोड कामगारांच्या प्रश्नावर भाजप आमदाराने उठवले रान

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही ऊस तोड कामगारांच्या प्रश्नावर रान उठवले आहे.

पंढरपूर : राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाच्या ऊस गाळप हंगाम तोंडावर आला असतानाच राज्यभरातील ऊस तोड कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साखर कारखान्यांच्या विरोधात कोयता बंद आंदोलन पुकारले आहे. मराठवाडा विदर्भात माजीमंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात धडकले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही ऊस तोड कामगारांच्या प्रश्नावर रान उठवले आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांनी ही आमदार पडळकरांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांच्या तोडणी दरात वाढ केली जाणार नाही तोपर्यंत हातात कोयता घेतला जाणार नाही असा इशारा दिला आहे. भाजप नेत्यांनी ऊस तोड कामगारांसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत.

मागील पाच वर्षापासून उस तोडणी मजूरांच्या दरात वाढ झाली नाही. जुन्याच दरात ऊस तोडणी कामगारांकडून काम करून घेतले जाते. कष्टांची कामे करताना ऊस तोड कामगारांना सरकारकडून कोणतेही संरक्षण दिले जात नाही. आज साखर कारखान्याच्या परिसरात शौचालये नसल्याने महिला मजुरांची कुचंबना होते. मुकादमांना ही साखर कारखान्याचे कोणतेही संरक्षण मिळत नसल्याने ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवसाय धोक्यात आला आहे.

सरकारने उस तोडणी दरात वाढ करावी करावी, मुकादमांचे कमिशन वाढवून द्यावे, महिलांसाठी शौचालयाची सोय करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठवाडा विदर्भात यापूर्वीच आंदोलन सुरू झाले आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ऊस तोड कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील ऊस तोड मजुर एकवटले आहे.

मंगळवेढा येथे रविवारी ऊस तोडणी कामगार आणि मुकादमांचा मेळावा झाला. यामध्ये अनेक ऊस तोडणी मजूर आणि मुकादम सहभागी झाले होते. राज्य सरकारने ऊस तोडणी मजूरांचे शोषण केले आहे. ज्यांच्या जीवावर साखर उद्योग सुरू आहे. तोच कामगार हा घटक उपेक्षित आहे. सरकार आणि साखर कारखानदारांनी ऊस तोडणी मजूरांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करत मजूरांनी कारखानदारांच्या विरोधात कोयता बंद आंदोलन पुकारले आहे. आमदार पडळकरांनी प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोड मजूरांच्या या आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख