पीव्ही नरसिंहराव यांना भारतरत्न द्या ! तेलंगणा सरकारची मागणी  - Give Bharat Ratna to PV Narasimha Rao! Demand of Telangana government | Politics Marathi News - Sarkarnama

पीव्ही नरसिंहराव यांना भारतरत्न द्या ! तेलंगणा सरकारची मागणी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

राव हे पंतप्रधान असताना  अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली

हैदराबाद : कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी विनंती करणारा ठराव आज तेलंगणा सरकारने विधानसभेत संमत केला. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव यांनी पंतप्रधानपद स्वीकारले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्यास नकार दिला होता. तसेच गांधी फॅमिलीतील कोणीही या पदासाठी पुढे आले नव्हते. 1991 ते 1996 पर्यंत राव यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले.

राजकारणातील चाणक्‍य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. राव हे पंतप्रधान असताना  अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली आणि या घटनेचे खापर अर्थात राव यांच्यावर फोडण्यात आले. 
जे नरसिंहराव कॉंग्रेसला प्रिय होते ते पुढे अप्रिय झाले. कॉंग्रेसला बाबरी पाडल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. कॉंग्रेसची सत्ता असताना मशीद कशी काय पाडली जाते हा प्रश्‍न आजही केला जातो. 

राव हे मुळचे आंध्रप्रदेशातील होते. मात्र त्यांनी नागपूरमधील रामटेक मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते. त्यांना चांगले मराठीही येत होते. कराडच्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांनी केलेले मराठीतील भाषण खूपच गाजले होते.

नरसिंहराव यांनी केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर केंद्रातील अनेक महत्त्वाच्या खात्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. राजकारणातील चाणक्‍य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावांना भारतरत्न द्यावा अशी विनंती तेलंगणा सरकारने आज केंद्राकडे केली आहे. 

या विषयी माहिती देताना नरसिंहराव यांचे नातू आणि तेलंगणातील भाजपचे ज्येष्ठ नेते एनव्ही सुभाष यांनी सांगितले, की जर पीव्ही नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तर आमच्या कुटुंबाला आनंदच होईल. 

कॉंग्रेसच्या प्रणब मुखर्जींना भारतरत्न 
भारताचे माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे एक बडे नेते प्रणब मुखर्जी यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले होते. हा पुरस्कार त्यांना दिला गेल्यानंतर कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता होती. ती कधीही लपून राहिली नाही.

मुखर्जी यांनी आपले संपूर्ण आयुष्य कॉंग्रेससाठी खर्ची केले होते. आता मुखर्जींपाठोपाठ नरसिंहराव यांना भारतरत्न देण्याची विनंती करण्यात आली आहे याबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख