फडणविसांची काळजी घेण्यासाठी गिरीश महाजन विशेष विमानाने मुंबईला... - girish mahajan leaves for mumbai by special plane to take care of fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

फडणविसांची काळजी घेण्यासाठी गिरीश महाजन विशेष विमानाने मुंबईला...

कैलास शिंदे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

फडणवीस यांनाही कोरोनाची लागण

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना  कोरोनची लागण झाल्याचे कळताच माजी मंत्री गिरीश महाजन विशेष विमानाने मुंबई येथे रवाना झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी एका चर्चेत महाजन यांना सांगितले होते की, मला कधी कोरोना झाला तर शासकीय रुग्णालयात दाखल करावे याची माहिती स्वतः महाजन यांनी दिली होती. फडणवीस यांना कोरोना झाल्याचे कळताच महाजन जळगाव विमानतळावरून विशेष विमानाने मुंबई येथे रवाना झाले आहेत. फडणवीस यांना अत्यंत सौम्य लक्षण असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद  देशमुख यांनी दिली.

लाॅकडाऊन लागू झाल्यापासून फडणवीस सातत्याने फिरत आहेत. गेल्या या आठवड्यात ते बिहारमधून महाराष्ट्रात पूरपाहणीसाठी सोमवारी आले होतो. बुधवारपर्यंत पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर ते गुरूवारी तातडीने बिहारला रवाना झाले. तेथेच त्यांना लागण झाली. बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी, राजीप्रताप रूड, शहानवाझ हुसेन हे पण कोरोनामुळे प्रचारापासून दूर राहिले. त्यात आता फडणवीस यांनाही सक्तीने आराम करावा लागला आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणतात की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फडणवीस हे लाॅकडाऊन काळात राज्यात फिरत असताना सरकारी रुग्णालयांची अवस्था पाहून अस्वस्थ झाले होते. तेथील रुग्णांचे हाल पाहून त्यांनी सरकावर कोरडे ओढले होते. याच काळात आपले मित्र गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. गिरीश, मला चुकून कोरोना झाला तर मला सरकारी रुग्णालयातच अॅडमिट करा, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील अनेक मंत्री, नेते हे कोरोनाने आजारी पडली होती. मात्र कोणीही सरकारी रुग्णालयात उपचार न घेता पंचतारांकीत रुग्णालयात जाणे पसंत केले. फडणवीस यांची याउलट भूमिका होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख