फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात लगावली.. राज्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.. - France President Emmanuel Macron got slapped by a person | Politics Marathi News - Sarkarnama

फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात लगावली.. राज्यकर्त्यांनी काळजी घ्यावी..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत

मुंबई : कोरोना संकटात सर्वस्व गमावलेल्या एका तरुणाने भररस्त्यात फ्रान्सचे  राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॅान Emmanuel Macron यांच्या श्रीमुखात लगावली.  या घटनेचा निषेध व्हायला पाहिजे, फ्रान्स हा लोकशाही प्रधान देश आहे. पण जनतेच्या कडेकोट होणार नाही, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.  France President Emmanuel Macron got slapped by a person

फ्रान्स हा लोकशाहीप्रधान देश आहे. संसदीय लोकशाहीस तेथे मोलाचे स्थान आहे. मॅक्रॉन हे निवडणुकीत विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मॅक्रॉन हे कुणाला आवडत नसतील तर त्यांच्यावर टीका होऊ शकते, पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली आहे. श्रीमुखात हा सभ्य संस्कारातील शब्द आहे. आपल्या भाषेत ‘थप्पड’ लगावली, थोबाड फोडले, कानफट रंगवले असे बरेच काही सांगता येईल. अध्यक्षांच्या कानफटात भडकावणे हा त्या देशाचाच अपमान आहे, पण असे माथेफिरू अनेक देशांत जागोजाग निपजत असतात. तैन-आय हर्मिटेज या छोट्या शहरात मॅक्रॉन एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोहोचले. तेथे जनतेच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एक व्यक्ती पुढे आली. त्याने राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांनाही जुमानले नाही व फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.
 
आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही
फ्रान्ससारखेच वातावरण जगातील अनेक देशांत आहे. आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. इथे तर लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे. हरिद्वार, वाराणसी, पाटणा येथील गंगा प्रवाहात या काळात प्रेतांचे तरंगणे व भडकलेल्या सामुदायिक चिता पाहून लोकांच्या मनात संतापाच्या ठिणग्या उडाल्याच असतील. म्हणून लोकांनी देशाच्या, राज्यांच्या सत्ताप्रमुखांच्या श्रीमुखात भडकविण्याचे उपक्रम सुरू केले नाहीत.

आपल्या देशातील जनता माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही.
फ्रान्स हा हिंदुस्थानप्रमाणेच लोकशाहीवादी देश आहे. आपल्याकडे इतकी लोकशाही रोमारोमांत भिनली आहे की, सारे काही सोसूनही आपल्या देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही. ऑक्सिजनअभावी आप्त स्वकीयांचे डोळ्यासमोर तडफडून होणारे मृत्यूही आपल्या जनतेने निमूटपणे सहन केले. कोविडच्या रुग्णांना बेड मिळो न मिळो, औषधांची, इंजेक्शन्सची टंचाई असो, लसीकरणास कितीही कालावधी लागो, पण आपल्या देशातील सोशिक जनता सरकाराविरुद्ध पेटून कधी माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही. हिंदुस्थानी जनतेची ही सहनशील प्रगल्भता फ्रान्सच्या जनतेमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आता विशेष प्रयत्न करायला हवेत!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख