जपानचे सरकार कोरोनापुढे झाले हतबल; ऑलिंपिक पुढे ढकलण्याची मागणी

जपानमध्ये (Japan) कारोनाची चौथी लाट धडकली आहे.
 Japan .jpg
Japan .jpg

टोकियो : जपानमध्ये (Japan) कारोनाची चौथी लाट धडकलेली असताना सरकार मात्र ऑलिंपिक (Olympics) बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जपानमध्ये केवळ एक टक्केच लसीकरण (Vaccination) झाले असून लाखो डोस फ्रिजरमध्ये पडून आहेत. (The fourth wave of corona in Japan)

रुग्णालयातील जागेअभावी काही गंभीर रुग्णांना घरीच थांबावे लागत आहे. त्यांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. दरम्यान, जपानने आशियायी देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घातले आहेत. नवीन निर्बंध १४ मे पासूनच लागू झाले आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ देशांचा समावेश आहे. (The fourth wave of corona in Japan)

जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. 

या रुग्णांना दवाखान्यात दाखल का केले नाही, याचे स्पष्टीकरण ओसाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाविलाजाने घरातच राहावे लागत आहे. काल ओसाका येथे चोवीस तासात कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळून आले तर टोकियोत हीच संख्या १०१० होती. गेल्या शुक्रवारी ओसाका नर्सिंग होममध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी भरतीसाठी वाट पाहणाऱ्या चौदा जणांचा मृत्यू झाला. जपानमध्ये आतापर्यंत ६,५१ ७०२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ११०६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७२०८० जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. पैकी १,१८९ रुग्ण गंभीर असल्याचे जपान आरोग्य विभागाने म्हटले आहे.

‘तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु’

दुसरीकडे जपानमध्ये एका वर्तमानपत्रात संपूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध करून देशातील लोक ‘राजकारणाला बळी’ पडत आहेत, असे म्हटले आहे. लस नाही, औषध नाही. आम्हाला श्‍वासाला भाला करून लढावे लागणार काय? परिस्थितीत बदल झाला नाही तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु, असे सरकारवर टीका करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जपानमध्ये केवळ एकच टक्के लसीकरण (Vaccination) झाले आहे.

तरीही ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षितपणे पार पाडल्या जातील, असे पंतप्रधान सुगा सांगत आहेत. त्यामुळे खासदारांत नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. काल जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com