भाजपाच्या चार आमदारांनी वार्षिक लेखाजोखा अद्याप दिलाच नाही.. - Four BJP MLA have not yet submitted their annual accounts  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपाच्या चार आमदारांनी वार्षिक लेखाजोखा अद्याप दिलाच नाही..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

चार आमदारांनी आपण वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर का ठेवला नाही याची चर्चा पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत.

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील सहापैकी चंद्रकांत पाटील व सिध्दार्थ शिरोळे या दोन आमदारांनी वार्षिक कामाचा अहवाल मतदारांसमोर मांडला आहे. उर्वरित चार आमदार आपल्या कामाचा अहवाल कधी मांडणार असे पक्षातील कार्यकते विचारू लागले आहेत. उर्वरित चार आमदारांमध्ये पर्वतीतून आमदार माधुरी मिसाळ, कॅन्टोन्मेन्टमधून सुनील कांबळे, खडकवासल्यातून भीमराव तापकीर तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचा यात समावेश आहे.

शिस्तबद्ध पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेना यांची तुलना केली तर पक्षीय शिस्त भाजपात अधिक असल्याचे बोलले जाते. चंद्रकांत पाटील हे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यातील इतर आमदारांना सांगण्याआधी त्यांनी स्वत: आमदार म्हणून केलेल्या कामाचा पहिल्या वर्षाचा अहवाल सर्वात आधी कोथरूडच्या मतदारांसमोर ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील इतर आमदारांनी काय केले यापेक्षाही शहरातील इतर चार आमदारांनी आपण वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर का ठेवला नाही याची चर्चा पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत.

पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी वडगाव शेरी व हडपसर हे दोन्ही मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या हातून थोडक्‍या मतांच्या फरकाने निसटले आहेत. हडपसरमधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे तर वडगाव शेरीतून राष्ट्रवादीचेच सुनील टिंगरे यांनी बाजी मारली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून पराभूत झालेले जगदीश मुळीक व योगेश टिळेकर हे दोन्ही माजी आमदार पुढच्यावेळी पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वात आधी आपल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले असताना इतर चारजण का मागे आहेत हा कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नाचा रोख आहे. आपल्या वार्षिक कामाचा अहवाल देणे हा भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीचा भाग असताना हे चार आमदार मागे का आहेत असाही प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख