ही आहे कोरोनाशी लढण्याची गुरूकिल्ली! डॅा. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानांना सुचना - Former PM Dr Manmohan Singh writes PM Narendra Modi about vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

ही आहे कोरोनाशी लढण्याची गुरूकिल्ली! डॅा. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानांना सुचना

वृत्तसंस्था
रविवार, 18 एप्रिल 2021

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा मुद्दा बनला आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा मुद्दा बनला आहे. रुग्णालयांना बेड, औषधे, व्हेंटिलेटर, अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे लशींच्या तुटवड्यामुळे त्यालाही वेग येताना दिसत नाही. यावर माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सुचना दिल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी त्यांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्र लिहून काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने गरीबांच्या खात्यात सहा हजार जमा करा, लशींसाठी वयाचे बंधन नको, वैद्यकीय उपकरणे जीएएसटी मुक्त करावे या तीन प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या वतीनेही काल पत्र लिहून नाराजी व्यक्त करत काही सुचना करण्यात आल्या आहेत. जनजीवन पुर्वपदावर येत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या महामारीशी लढण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. पण त्यातील महत्वाचा भाग हा लसीकरण वेगाने करणे हा आहे, असे ते म्हणाले.

त्यानंतर आज डॅा. मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने लसीकरणावर भर दिला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणही ही किल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. '45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना लसीकरण दिले जावे. हे ठरविण्याचे अधिकार राज्यांना द्यावेत. शिक्षक, बस, तीनचाकी, ट्रक्सी चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, वकील आदींना 45 वर्षाच्या आत असूनही त्यांना फ्रंटलाईन वर्कर गृहित धरून लस द्यायला हवी,' असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

राज्यांना पारदर्शक पध्दतीने लशींचे वाटप व्हायला हवे. याबाबत राज्यांना पुर्वकल्पना दिल्यास त्यांना पुढील नियोजन करणे शक्य होईल. मागील काही दशकांमध्ये भारत जगातील लशींचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश बनला आहे. पण सध्याच्या परिस्थितीत हे उत्पादन वाढविण्यासाठी कंपन्यांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवे, असेही पत्रात म्हटले आहे.

देशातील किती लोकांना लस दिली, हे आकडे न पाहता एक लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के लोकांचे लसीकरण झाले, याकडे लक्ष द्यायला हवे.  लसीचे ऑर्डर पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यांत कसे वितरित केले जाणार. हे आधीच सांगितले पाहिजे. वेगवेगळ्या लस उत्पादकांना पुढील सहा महिन्यांसाठी किती ऑर्डर देण्यात आल्या, हे सरकारने सांगावे. ज्या प्रमाणात लसीकरण करायचे आहे , त्यानुसार  आगाऊ लशींची पुरेशी ऑर्डर दिली पाहिजेत, असे मुद्देही माजी पंतप्रधानांनी उपस्थित केले आहेत.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख