वाढीव वीजबिले ऊर्जामंत्र्यांना पाठविणार   - The former MP will send the increased electricity bills to the energy minister | Politics Marathi News - Sarkarnama

वाढीव वीजबिले ऊर्जामंत्र्यांना पाठविणार  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

वितरणचा काला चिठ्ठा उर्जामंत्र्यांना पाठवणार असून, राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.

मुंबई : कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, महामुंबई अशा राज्याच्या सर्व भागांतून वाढीव वीजबिलांचे 100 नमुने गोळा केले आहेत. या वितरणचा काला चिठ्ठा उर्जामंत्र्यांना पाठवणार असून, राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशांवर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महावितरणच्या घोटाळ्याची वितरणचा काला चिठ्ठा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून राज्य सरकार हे प्रत्येक विषयात चालढकल कशी करता येईल, याचाच विचार करतेय, असे वक्तव्य पाटील यांनी केले. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, निरंजन डावखरे, सरचिटणीस श्रीकांत भारतीय व राज पुरोहित उपस्थित होते. कोरोना काळात सरासरी वीजबिल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केलेला, मात्र प्रत्यक्षात फक्त एप्रिल, मे आणि जून मध्ये सरासरी बिले दिली. जुलै महिन्याचे प्रत्यक्ष रिडींगनुसार बिले देणार असे सांगून तब्बल दुप्पट-तिप्पट किमतीची वाढीव बिले वाटली गेली. 

महावितरणला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी आणि विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी 20 हजार कोटी रुपयाची आवश्‍यकता होती. राज्य सरकारने हतबलता दर्शवल्यामुळे मंत्रालयामध्ये बसून सामान्यांची अशा वाढीव बिलांच्यारूपाने लूट करण्याचा निर्णय खुद्द राज्य सरकारनेच घेतला. जवळपास 1 लाखाहून अधिक ग्राहकांना 5 हजार युनिटपर्यंत वाढीव रिडिंग दाखवून वाढीव वीजबिल दिल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांना वाढीव बिल दिल्याचे आणि त्यात सुधारणा केल्याचे महावितरणने मान्य केले, असेही त्यांनी नमूद केले. 

राज्य सरकारने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या रिडींगला स्थगिती द्यावी, जुलै महिन्याची बिले मागे घ्यावीत, कोरोना काळात केलेली 20 ते 22 टक्के दरवाढ रद्द करावी व वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, महामुंबई अशा राज्याच्या सर्व भागांतून वाढीव वीजबिलांचे 100 नमुने गोळा केलेले वितरणचा काला चिठ्ठा उर्जामंत्र्यांना पाठवणार असून, राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.
 Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख