Former MLA Sitaram Ghandat joins NCP | Sarkarnama

माजी आमदार सीताराम घनदाट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

"याआधी घनदाट मामा यांना तिकीट हवं होतं म्हणून ते आले होते पण त्यावेळी आम्ही देऊ शकलो नाही. आज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो," असं अजित पवार यांनी सांगितलं. 

मुंबई  : गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट, जिल्हा परिषद सदस्य परभणी व अभ्युदय बँकचे संचालक भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. "याआधी घनदाट मामा यांना तिकीट हवं होतं म्हणून ते आले होते पण त्यावेळी आम्ही देऊ शकलो नाही. आज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो," असं अजित पवार यांनी सांगितलं. 

घनदाट परिवाराचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात प्राबल्य पाहता घनदाट यांना नक्कीच याचा फायदा होईल भरत घनदाट हे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. गंगाखेड विधानसभेचे युवक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घनदाट यांचे प्राबल्य यामुळे नक्कीच गंगाखेड विधानसभेला नवीन समीकरण येणार हे पक्षप्रवेश यावरून दिसून येते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गंगाखेड विधानसभेचे तिकीट सीताराम घनदाट यांना देण्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांचा पत्ता कट करून घनदाट यांना उमेदवारी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश तेव्हा स्थगित झाला होता.  

गंगाखेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार केंद्रे यांचा पराभव झाल्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोधी गटाने आपल्या हालचाली गतिमान केल्या असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघात घनदाट यांचा पक्षप्रवेश घडवून केंद्रे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या एका गटाकडून होत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार राजेश विटेकर व मधुसूदन केंद्रे यांच्या मध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मतभेद उफाळून आले.केंद्रे यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करून शिवसेनेला मदत केली असा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी यांनी केला होता.त्यानंतर केंद्र यांनीही बाबाजानी यांच्यावर टीका केली होती या आरोप-प्रत्यारोपांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हांतर्गत बरीच चर्चा रंगली होती. दरम्यानच्या काळात या सर्व घडामोडी थंडावल्या होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख