वडगाव शेरी : महावितरणच्या नगर रस्ता विभागात सकाळी कामावर येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना अनपेक्षितपणे अनोख्या स्वागताला सामोरे जावे लागले. चक्क गुलाब पुष्प देऊन माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी हे स्वागत केले. स्वागत झाल्यावर मात्र या कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कारण स्वागत झालेली ही मंडळी कामावर उशिरा हजर झाली होती.
'सरकारी काम आणि थोडे थांब' असा अनुभव वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना वारंवार येत आहे. त्यातच महावितरणच्या नगर रस्ता विभागातील कर्मचारयांबाबाबत अनेक तक्रारी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांकडे नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी पठारे आज स्वतः सकाळी दहा वाजता कार्यालयात हजर झाले. त्या वेळी कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. थोड्या वेळानंतर हळू एक एक कर्मचारी कार्यालयात यायला सुरुवात झाली. पावणे अकरा वाजेपर्यंत सगळे कर्मचारी कार्यालयात हजर झाले.
माजी आमदार पठारे यांच्या गांधीगिरीला सामोरे जावे लागल्याने आणि हा सर्व प्रकार अनपेक्षित असल्याने हे सर्व कर्मचारी गांगारून गेले. महावितरणच्या नगर रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव हे पुण्यातील मुख्य कार्यालयातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले होते. कर्मचारी उशिरा येण्याचा प्रकार आणि माजी आमदारांनी केली गांधीगिरी समजल्यानंतर कार्यकारी अभियंता या ठिकाणी पोहोचले. उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा उशिरा येणार नाही असे आश्वासन वरिष्ठांना दिले.
#मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांनी घेतली सरकारी वकिलांची भेट.. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
https://t.co/47iWfNE0jF— Sarkarnama (@MySarkarnama) November 7, 2020
याविषयी कार्यकारी अभियंता अशोक जाधव म्हणाले की या कार्यालयात तीस कर्मचारी काम करतात. त्यातील आठ ते नऊ लोक आज पाऊण तास उशिरा आले. नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की या भागातील तलाठी कार्यालय आणि महावितरण कार्यालयातील कर्मचारी सकाळी वेळेवर हजर रहात नाहीत, अशा तक्रारी आहेत. मीसुद्धा हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सहाजिकच सरकारी कामालाही उशीर होतो. नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. याची जाणीव व्हावी, यासाठी आज गांधीगिरी मार्गाने माझ्या भावना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत मी पोहोचवल्या. यानंतर तलाठी कार्यालयातही अशी गांधीगिरी करणार आहे.

