'सारथी'साठी जीवनात पहिल्यांदाच रस्त्यावर बसलो : संभाजीराजे  - For the first time in my life, I sat on the road for 'Sarathi': Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

'सारथी'साठी जीवनात पहिल्यांदाच रस्त्यावर बसलो : संभाजीराजे 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

अजून बरेच टप्पे बाकी आहेत.

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेस आज राज्य सरकारने स्वायतत्ता बहाल केली. मराठा क्रांती मोर्चातर्फे गेली काही दिवस सुरु असलेली महत्वाची मागणी यानिमित्ताने आज सरकारने मान्य केली. या संदर्भात राज्य सरकारचे उपसचिव दी. शि. देसाई यांनी हा आदेश काढला आहे. 

या निर्णयाचे मराठा क्रांती मोर्चा व अन्य नेत्यांनी स्वागत केले असले तरी खासदार संभाजीराजेंची नाराजी अजूनही कायम असल्याचे दिसते. त्यातूनच त्यांनी "सारथी'ला जाणीवपूर्वक षडयंत्र रचून बदनाम करणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड करा, अशी मागणी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. 

यासंदर्भात आज हा आदेश निघाल्याने गेली काही दिवस संस्थेचे कामकाज व त्यातील राज्य सरकारचा हस्तक्षेप यावरुन सुरू असलेल्या वादाचा शेवट झाला आहे. मध्यंतरी प्रशासनातील एक गट ही संस्था अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यावर चर्चा झाली होती. आज झालेल्या निर्णयात अजित पवार यांची महत्वाची भूमिका असल्याने त्यांचे मराठा क्रांती मोर्चाकडून आभार मानण्यात आले आहे. 

पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की "सारथी'ला आधी जाणीवपूर्वक बदनाम करून स्वायत्तता घालवली. ही स्वायत्तता टिकविण्यासाठी समाजाच्या वतीने आम्ही अनेक आंदोलने केली. जीवनात पहिल्यांदा 'सारथी'च्या कार्यालयासमोर रस्त्यावर बसून लाक्षणिक उपोषण केले. तसेच, हा मुद्दा आजपर्यंत सातत्याने लावून धरल्यामुळे आज "सारथी' संस्थेला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले गेल्याचे समजते.

अजून बरेच टप्पे बाकी आहेत. सारथीबाबत निर्णय घेण्यासंबंधीचे अधिकार संचालक मंडळाला देण्यात येतील, असे एका "जीआर' द्वारे सांगण्यात आले आहे. 

"मराठा समाजाने आत्ताच याबाबत समाधानी न होता, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून "सारथी' बंद करण्याचा घाट घातला गेला? याची शहानिशा करून घेतली पाहिजे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेली आणि मराठा समाजाला दिशा देणारी ही संस्था ठप्प केली गेली. विविध प्रकारचे आरोप करून तिला बदनाम केले गेले. मराठा समाजाचे अमूल्य असे एक ते दीड वर्ष अक्षरशः वाया घालवले. भ्रष्टाचार आणि तत्सम आरोप सिद्ध तरी करा किंवा जाणीवपूर्वक षडयंत्र रचणाऱ्या मंत्रालयीन अधिकाऱ्याला सस्पेंड तरी करा, अशी मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने आम्ही करतो,' असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख