आयुष्यात प्रथमच राष्ट्रवादीला मतदान; तरीही तुमचे सहकार्य नाही  - first time in life Vote gave the NCP ; Still no cooperation : Chandrakant Patil : | Politics Marathi News - Sarkarnama

आयुष्यात प्रथमच राष्ट्रवादीला मतदान; तरीही तुमचे सहकार्य नाही 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

'रामराजे... आज तुम्ही दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा कळस गाठला आहे,'

मुंबई  : भारतीय जनता पक्षाचा विरोध झुगारून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक घेण्यास परवानी देणारे सभागृहाचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना नाराजी दर्शविणारे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी लिहिले आहे.

"रामराजे... आज तुम्ही दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा कळस गाठला आहे,' अशा शब्दांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची आवाजी मताने मंगळवारी (ता. 8 सप्टेंबर) निवड झाली. भारतीय जनता पक्षाने उपसभापती निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर गोऱ्हे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही पार्श्‍वभूमी चंद्रकांत पाटील यांच्या पत्र लिहिण्यामागची आहे. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. कोरोनाग्रस्त आमदारांना मतदानासाठी मुंबईत पोचणे शक्‍य नाही, त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक घेणे अयोग्य आहे, अशी भूमिका भाजपने घेतली होती. 

विधान परिषदेच्या सदस्यांना मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप करत भाजपचे प्रतोद सूरजितसिंह ठाकूर यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्याची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 10 सप्टेंबर) ठेवली आहे. त्यामुळे निवडणुकीची एवढी घाई का? उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी आहे; तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. 

त्यावर "उच्च न्यायालयाने मला बोलावलेले नाही. निवडणूक बोलाविण्याचा अधिकार सभागृहाचा सभापती म्हणून माझा आहे. सभागृहाचे अंतर्गत कामकाज हे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र नाही, त्यामुळे माझ्या अधिकारात निवडणूक घेण्याचा निर्णय कायम आहे,' असे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सांगितले होते. 

या भूमिकेबद्दल चंद्रकांतदादांनी रामराजे यांना तातडीने पत्र लिहून नापसंती व्यक्त केली आहे. पत्रात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, "रामराजे...चार वर्षांपूर्वी आपणास सभापती म्हणून निवडताना आयुष्यात कधीही राष्ट्रवादीला न केलेले मतदान आम्ही केले. परंतु आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. आज तर आपण दुजाभावाचा आणि दबावाखाली काम करण्याचा कळस गाठला आहे.' 

कोरोना महामारीत उपसभापतीची निवडणूक? भाजपचे तीन सदस्य कोविडबाधित तरीही निवडणूक? सभागृहात 78 च्या ऐवजी 60 सदस्य उपस्थित, तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्‍चर्य आहे.

एक निस्पृह व्यक्तीमत्त्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्‍चितच कमी झाला आहे. असो...राजकारणात हे चालायचंच...असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी अपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख