खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - FIR against MP imtiaz Jalii in Aurangabad for violating curfew | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

कोरोनाकाळातील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी फिर्याद दिली होती.

औरंगाबाद ः शहरातील रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खासदार जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.सात) हे आंदोलन केले होते. ‘महापालिका आयुक्त मुर्दाबाद’, ‘महापालिकेचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ आदी घोषणा दिल्या होत्या. खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक झाडे लावून निषेध करत बॉम्बशोधक पथकाप्रमाणे कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून उड्डाणपुलावरील खड्डे शोधले होते. या आंदोलनादरम्यान वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.

कोरोनाकाळातील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार खासदार जलील, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेर बिल्डर, जिल्हा अध्यक्ष अरुण बोर्डे, मुन्शी पटेल, नासेर सिद्दिकी, रफिक चित्ता, आरेफ हुसैन, सांडू इसाक हाजी, गंगाधर ढगे, गजानन उगले पाटील, जमीर अहेमद काद्री, अनिस शेख, मुदस्सीर अन्सारी यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. उपनिरीक्षक शंकर डुकरे तपास करीत आहेत.

 

ही पण बातमी वाचा : खासदारांनी धुतले महावितरणच्या अभियंत्याचे पाय

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खासदार संजय जाधव यांनी चक्क महावितरणच्या अभियंत्याचे पाय मंगळवारी (ता.आठ) धुतले. विजेच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने अखेर खासदारांना हा पवित्रा घ्यावा लागला.

परभणी जिल्ह्यात शेतीशी निगडित अनेक प्रश्न महावितरणच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना रोहित्र देण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावला जात आहे; तसेच तासंतास वीज गायब राहत असल्याने शेतीची कामेदेखील खोळंबत आहेत. यासंदर्भात मंगळवारी दोन ते तीन गावांतील शेतकरी खासदार संजय जाधव यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. अनेकवेळा महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी भेटत नसल्याने हा विषय तसाच प्रलंबित राहिला होता. त्यामुळे चिडलेल्या खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात जाब विचारला. परंतु कोणत्याच प्रश्नाचे बरोबर उत्तर न मिळाल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी चक्क तेथे उपस्थित असलेल्या अभियंत्याचे पाय पाण्याने धुतले. या प्रकारामुळे गांगारून गेलेल्या अभियंत्यांना मात्र घाम फुटला. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत तर महावितरणच्या कार्यालयात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख