अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला सोलापूर दौरा  - Finally, Chief Minister Uddhav Thackeray announced his visit to Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला सोलापूर दौरा 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता. 19 ऑक्‍टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांना "मातोश्री'तून बाहेर पडा, असे आवाहन विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडून वारंवार करण्यात येत होते. तसेच, मनसेच्या नेत्यांनी तशी मागणी केली होती. 

मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते सकाळी 10.45 वाजता सांगवी खुर्द गावातील नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर अकरा वाजता बोरी नदी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर साडेअकरा वाजता अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाची पाहणी करतील, तर दुपारी बारा वाजता रामपूर गावातील शेती नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे घेणार आहेत. दुपारी 12.30 वाजता बोरी उमरगे गावातील नुकसानीची माहिती ते शेतकरी आणि अधिकाऱ्यांकडून गावात जाऊन घेणार आहेत. 

दरम्यान, शरद पवार हे उद्यापासून (ता. 18 ऑक्‍टोबर) मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीतून सोमवारपासून (ता. 19) अतिवृष्टीच्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपला सोलापूर जिल्ह्याचा दौरा जाहीर केला आहे. 

मनसेने मुख्यमंत्र्यांना काय दिला होता सल्ला? 

मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण, आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन (online) बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा "ठाकरे' नावावरील विश्वास उडेल, असा सल्ला नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे, त्याला शेताच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याची गरज आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने पंचनाम्याचा आदेश देऊन भागणार नाही, तर या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन हे काम करावे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी ट्विटमधून केली होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख