रामदेवबाबाविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करा... काँग्रेसची मागणी

जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण, डॉ. तोमर यांच्यासह त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे.
4coronil_0.
4coronil_0.

मुंबई  : पतंजलीच्या ‘कोरोनील’ औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करुन पतंजली करून मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. परंतु, राजस्थान व उत्तराखंड सरकारने कारवाईचा बडगा उगारताच असे औषध निर्माण केलेच नाही पवित्रा पतंजलीने घेतला आहे. कारवाईच्या भीतीने त्यांनी भूमिका बदलली असली तरी कोरोना बरा करणारे औषध निर्माण केल्याचा खोटा दावा करुन जनतेची दिशाभूल, फसवणूक व बनवाबनवी केल्याबद्दल रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण, डॉ. तोमर यांच्यासह  त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे.याबाबत ओझा यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना आपण सर्वजण करत असताना काही लोक या संकटातही गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. पतंजली या आयुर्वैदिक औषध कंपनीनेही या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कोरोनील’ नावाचे औषध आणल्याचा दावा केला होता. परंतु, या औषधाची कोठेही चाचणी केलेली नव्हती.
 

हा सर्व प्रकार जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारा असल्याने नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यामध्ये २४ जून २०२० रोजी रामदेवबाबा व त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी अर्ज दाखल केले आहे. परंतु आजपर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पतंजलीने भूमिका बदलली असली तरी अशापद्धतीने जनतेची फसवणूक करणे हा एक गुन्हाच असल्यामुळे तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन रामदेवबाबावर गून्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याला द्यावेत, असे ओझा यांनी पत्रात म्हटले आहे.  

योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी  कोरोनावरील उपचारासाठी तयार केलेल्या ओैषधाची विक्री करता येईल मात्र, ते कोरोनावरील म्हणून नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे औषध म्हणून विका, असे आयुष मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. यावर रामदेव बाबा पत्रकार परिषदेत म्हणाले की, पतंजली आणि केंद्र सरकारमध्ये विसंवाद नाही. औषधाबाबत सुरू असलेला प्रश्न सुटेपर्यंत ते आयुर्वेदिक औषध म्हणून विकण्यास आम्ही परवानगी मागितली होती. काही जण भारतीय संस्कृतीला लक्ष्य करीत आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी हे औषध वापरावे. आता या औषधाच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

हे औषध विक्रीसाठी देशभरात उपलब्ध आहे. आयुष मंत्रालय आणि पतंजलीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. रामदेवबाबा यांच्या पतंजली संस्थेने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला होता. या औषधातील घटक आणि चाचण्यांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने अखेर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आयुष मंत्रालयाने या औषधाबाबत हात झटकले होते. या औषधातील घटकाची पूर्ण तपासणी होत नाही, तोपर्यंत त्याची कोरोनावरील औषध अशी जाहिरात करु नये, अशा सूचना पतंजलीला देण्यात आल्या आहेत. 

पतंजलीने मंगळवारी कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा केला होता. कोरोनिल आणि श्‍वासारी अशी या औषधांची नावे आहेत. पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार, देशात २८० रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. या औषधाच्या दोन टप्प्यांत चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पतंजली संशोधन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि निम्स विद्यापीठ, जयपूर या संस्थांनी एकत्र येऊन या औषधांसाठी संशोधन केले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com